नागपूर : महिला विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेच्या अंतिम लढतीत अनुभवी कोनेरू हम्पीविरुद्ध खेळावे लागणार असल्याचे मी अतिरिक्त दडपण घेतले नाही. मी केवळ सर्वोत्तम कामगिरीवर लक्ष केंद्रित केले आणि त्यामुळेच मला जेतेपद मिळविण्यात यश आले, अशी प्रतिक्रिया ग्रँडमास्टर दिव्या देशमुखने व्यक्त केली.
आठवड्याच्या सुरुवातीला १९ वर्षीय दिव्याने बुद्धिबळाच्या जलद प्रकारातील दोन वेळच्या जगज्जेत्या हम्पीला ‘टायब्रेकर’मध्ये पराभूत करून महिला विश्वचषक स्पर्धेचे जेतेपद पटकावले. यासह तिने प्रतिष्ठेचा ‘ग्रँडमास्टर’ किताबही मिळवला. विश्वचषक स्पर्धेपूर्वी तिने ‘ग्रँडमास्टर’ किताबासाठीचा एकही निकष पूर्ण केला नव्हता. मात्र, या स्पर्धेत मातबर चिनी प्रतिस्पर्धी, तसेच द्रोणावल्ली हरिका आणि हम्पी यांसारख्या भारताच्या ग्रँडमास्टर बुद्धिबळपटूंना नमवत दिव्याने विश्वचषक जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरण्याचा मान मिळवला. दिव्याचे जॉर्जियाहून नागपुरात बुधवारी आगमन झाले. यानंतर तिने माध्यमांशी संवाद साधला.
‘‘अंतिम लढतीत हम्पीविरुद्ध विजय मिळविणे आव्हानात्मक असणार हे ठाऊक होते. मात्र, मला कधीही धोका असल्यासारखे वाटले नाही. अखेरीस तिच्याकडून चूक झाल्याने माझा विजयाचा मार्ग मोकळा झाला,’’ असे दिव्या म्हणाली.
‘‘अंतिम निकाल माझ्या हातात नव्हता. त्यामुळे मी केवळ सर्वोत्तम कामगिरी करण्यावर लक्ष केंद्रित केले. मी अन्य कशाचाही विचार करत नव्हते. मी अतिरिक्त दडपणही घेतले नाही. त्यामुळेच मला यश मिळवता आले,’’ असेही दिव्याने सांगितले.
तसेच आपल्या यशामुळे भारतातील महिला बुद्धिबळ आता आणखी उंचीवर पोहोचेल अशी आशाही दिव्याने व्यक्त केली. ‘‘माझ्या यशातून इतरांना प्रेरणा मिळेल आणि आणखी मुली बुद्धिबळ खेळण्यास सुरुवात करतील अशी आशा आहे. तुम्ही मोठी स्वप्न पाहून ती सत्यात उतरविण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. अशक्य असे काहीच नसते,’’ असेही दिव्या म्हणाली.