भारतीय क्रिकेटपटू हे त्यांच्या खेळाव्यतिरीक्त आपल्या चाहत्यांमध्ये आणखी एका कारणासाठी प्रसिद्ध आहेत. विराट कोहली, युवराज सिंह, अजिंक्य रहाणे यासारख्या अनेक खेळाडूंचं स्टाईल स्टेटमेंट आजचे तरुण फॉलो करत असतात. यात आता आणखी एका खेळाडूची भर पडली आहे. आपल्या अष्टपैलू खेळासह पांड्या त्याच्या हेअर स्टाईलमुळेही तितकाच प्रसिद्ध झाला आहे.
चॅम्पियन्स करंडकात अंतिम सामन्यात हार्दीक पांड्याने केलेल्या खेळीमुळे पांड्या चर्चेत आला होता. महत्वाची गोष्ट म्हणजे भारताच्या रथी महारथी फलंदाजांनी नांगी टाकल्यानंतरही पांड्याने पाकिस्तानी गोलंदाजांना नेटाने सामना केला होता. नुकतीच हार्दीक पांड्याने आपली हेअर स्टाईल बदलली असून, या नवीन लूकचा फोटो त्याने आपल्या इनस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे.
सेलिब्रेटी हेअर स्टायलिस्ट हकीम आलीमने पांड्याला हा नवीन लूक दिला आहे. हकीमसोबत आपला फोटो टाकत पांड्याने, ”मला हा नवीन लूक प्रचंड आवडला आहे, तू खरचं जादूगार आहेस!”, असं म्हणलं आहे. याआधीही हकीमने अजिंक्य रहाणे, विराट कोहली यांची हेअर स्टाईल करत त्यांना एक नवीन लूक दिला आहे.
भारताच्या आगामी श्रीलंका दौऱ्यात कसोटी संघात पांड्याची निवड झालेली आहे. या व्यतिरीक्त दुखापतीमुळे गेले काही दिवस संघाबाहेर असलेले के.एल.राहुल आणि मुरली विजय यांनीही संघात पुनरागमन केलं आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांमधली हार्दीक पांड्याची कामगिरी पाहता त्याला कसोटी संघात जागा मिळते का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
भारताच्या श्रीलंका दौऱ्याची सुरुवात २६ जुलैपासून होणार असून पहिली कसोटी ‘गॅले’च्या मैदानावर खेळवण्यात येणार आहे.