अँटवर्प : मनदीप सिंग आणि आकाशदीप सिंग यांनी मध्यंतरानंतर नोंदवलेल्या गोलच्या बळावर भारताच्या पुरुष हॉकी संघाने बेल्जियमविरुद्धच्या पहिल्या सामन्यात गुरुवारी २-० असा शानदार विजय मिळवला. त्यामुळे तीन सामन्यांच्या मालिकेत आता भारताने १-० अशी आघाडी मिळवली आहे.

मनदीपने ३९व्या मिनिटाला पहिला गोल केला, तर आकाशदीपने ५४व्या मिनिटाला दुसरा गोल साकारला. पहिल्या सत्रात भारताला पहिल्या पेनल्टी कॉर्नरद्वारे गोल करण्याची संधी चालून आली होती. परंतु गोलरक्षक लॉइक व्हॅन डोरेनने भारताचे प्रयत्न हाणून पाडले. मग बेल्जियमला पेनल्टी कॉर्नर मिळाला. परंतु भारतीय गोलरक्षक कृष्णन पाठकने त्यांचा प्रयत्न हाणून पाडला.

बेल्जियमकडे सामन्याच्या पहिल्या दोन सत्रांमध्ये चेंडूचा ताबा असतानाही गोल करू न देण्याची काळजी भारतीय बचाव फळीने घेतली. त्यामुळे मध्यंतरापर्यंत गुणफलक गोलशून्य बरोबरीत होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मनदीपला ३९व्या मिनिटाला गोल झळकावण्यात यश आले. याच आघाडीमुळे अखेरच्या सत्रात भारताने आत्मविश्वासाने कामगिरी केली. बेल्जियमच्या आक्रमणानेही बरोबरीच्या ईर्षेने खेळ केला. मग ५४व्या मिनिटाला आकाशदीपला दुसरा गोल करण्यात यश आले. भारताचा दुसरा सामना २८ सप्टेंबरला होणार आहे.