भारताने लंडन येथे झालेल्या चॅम्पियन्स चषक हॉकी स्पर्धेत रौप्यपदक मिळवत नेत्रदीपक कामगिरी केली आहे. आता त्यांनी आगामी ऑलिम्पिकमध्येही पदक जिंकावे, असे माजी ऑलिम्पिकपटू धनराज पिल्ले यांनी सांगितले.
‘ऑलिम्पिकमध्ये चार वेळा प्रतिनिधित्व करूनही मला देशाला ऑलिम्पिक पदक मिळवून देता आले नाही. मला अपेक्षेइतकी कामगिरी करता आली नाही. चॅम्पियन्स स्पर्धेत प्रथमच आपल्या संघाने अंतिम फेरी गाठली होती. त्यांनी ऑस्ट्रेलियासारख्या बलाढय़ संघाला खूपच चिवट लढत दिली. त्यांच्या या कामगिरीने मी भारावून गेलो आहे. यश व अपयश या खेळाच्या दोन बाजू असतात. जरी कांगारूंविरुद्ध आपल्या संघाला पराभव स्वीकारावा लागला असला तरी या सामन्यात भारतानेच वर्चस्व गाजवले असे माझे स्पष्ट मत आहे. या सामन्यातील ७० मिनिटे भारतीय खेळाडूंनी जे सातत्य दाखविले, तसे सातत्य मी खेळत असतानाही आम्हाला दाखवता आले नव्हते,’’ असे धनराज यांनी सांगितले.
‘‘ऑलिम्पिकमध्ये पदक मिळविण्यासाठी भारतीय खेळाडूंनी मैदानी गोलवर अधिक भर दिला पाहिजे. विशेषत: गोल करण्याबाबत भारतीय खेळाडूंनी अचूकतेवर लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता आहे. मिळालेल्या संधींचे सोने कसे करता येईल याचा विचार त्यांनी केला पाहिजे,’’ असेही धनराज यांनी सांगितले.
भारतीय संघातील खेळाडूंच्या तंदुरुस्तीबाबत धनराज यांनी भारतीय संघाचे प्रशिक्षक रोलँट ओल्टमन्स यांचे कौतुक करताना म्हटले की, ‘‘रोलँट यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय खेळाडूंनी गेल्या सहा महिन्यांत प्रशंसनीय कामगिरी केली आहे. चॅम्पियन्स स्पर्धेत ऑस्ट्रेलियापेक्षाही आपल्या खेळाडूंच्याआक्रमक चाली अव्वल दर्जाच्या होत्या. वरिष्ठ खेळाडूंना अधूनमधून विश्रांती देणे व युवा खेळाडूंना त्यांच्याऐवजी संधी देणे ही त्यांची रणनीती प्रभावी ठरली आहे.’’
टेबल टेनिस लीगमध्ये धनराजचा संघ
भारताचा माजी हॉकी कर्णधार धनराज पिल्ले मुंबई सुपर टेबल टेनिस लीगमधील एका संघाचा सहमालक झाला आहे. ‘‘गेल्या वर्षी या लीगच्या पारितोषिक वितरण समारंभाला मी पाहुणा म्हणून उपस्थित होतो. त्यावेळी ही लीग पाहून मी भारावून गेलो आणि कमलेश मेहता यांना लीगमध्ये संघ घेण्यासाठी इच्छुक असल्याचे सांगितले. त्यानुसार या हंगामामध्ये मी एका संघाचा सहमालक झालो आहे. यापुढे हॉकीमधील एका लीगमध्येही संघ घेण्यासाठी मी प्रयत्नशील आहे,’’ असे धनराजने सांगितले.