प्रशिक्षक हरेंद्र सिंग यांचे मत
आशिया चषक स्पर्धा जिंकली असली तरी भारतीय कुमार हॉकी संघापुढील आव्हाने संपलेली नाहीत. जगात अव्वल दर्जाचा संघ होण्यासाठी त्यांना खडतर परिश्रम करावे लागणार आहेत, असे भारतीय कनिष्ठ हॉकी संघाचे प्रशिक्षक हरेंद्र सिंग यांनी सांगितले.
भारताने मलेशियात झालेल्या आशिया चषक स्पर्धेतील अंतिम सामन्यात पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला ६-२ अशी धूळ चारली. या सामन्यात हरमानप्रीत सिंगने हॅट्ट्रिक नोंदवत महत्त्वाचा वाटा उचलला. या कामगिरीबद्दल हरेंद्र सिंग म्हणाले, ‘‘आशियाई विजेतेपद ही आमच्यासाठी सुरुवात आहे. आम्ही प्रत्येक सामन्याद्वारे खेळात प्रगती करीत आहोत. आम्ही या संघांसाठी जी काही ध्येये निश्चित केली आहेत, त्याच वाटेने त्यांची वाटचाल सुरू आहे. अर्थात या विजयामुळे आमच्या खेळाडूंनी बरेच यश मिळवले असे मी मानत नाही. त्यांना अजून मोठा पल्ला गाठायचा आहे.’’
‘‘आम्हाला केवळ स्पर्धावर समाधान मानावयाचे नसून जगातील अव्वल दर्जाच्या संघांबरोबर भरपूर सामने खेळावयाचे आहेत. विशेषत: जर्मनी, बेल्जियम, इंग्लंड व नेदरलँड्स यांच्यासारख्या बलाढय़ संघांबरोबर कसोटी सामन्यांची मालिका झाल्यास आमच्या खेळाडूंना चांगला अनुभव मिळेल. आशिया चषक स्पर्धेचे विजेतेपद कुमार गटाच्या विश्वचषक स्पर्धेतील सामन्यांची कार्यक्रमपत्रिका निश्चित करताना फायदेशीर ठरेल. पुढील वर्षी १ ते ११ डिसेंबर २०१६ मध्ये नवी दिल्ली येथे ही स्पर्धा होणार आहे. आशिया चषक जिंकल्यामुळे आमच्या खेळाडूंचे मनोधैर्य उंचावले आहे. या विजेतेपदाचे श्रेय कोणत्याही एका खेळाडूस देता येणार नाही. हॉकी हा सांघिक खेळ आहे. साहजिकच संघातील प्रत्येक घटकाचा त्यामध्ये मोठा वाटा आहे,’’ असेही हरेंद्र सिंग यांनी सांगितले.
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याबाबत ते म्हणाले, ‘‘आमच्या खेळाडूंवर कोणतेही दडपण नव्हते. मी त्यांना त्यांचा पारंपरिक खेळ करायचा व क्षमतेनुसार कौशल्य दाखवण्याचा सल्ला दिला. पाकिस्तानच्या खेळाडूंचे कच्चे दुवे त्यांना समजावून दिले व त्याप्रमाणे व्यूहरचना करण्यास सांगितले व खेळाडूंनी त्यानुसार खेळ केला.’’
प्रत्येक खेळाडूला एक लाखाचे इनाम
आशिया चषक जिंकणाऱ्या भारतीय संघातील प्रत्येक खेळाडूला एक लाख रुपयाचे पारितोषिक हॉकी इंडियातर्फे दिले जाणार आहे. तसेच संघाच्या प्रशिक्षक चमूला प्रत्येकी ५० हजार रुपयांचे बक्षीस मिळणार आहे. सर्वाधिक गोल करणारा हरमनप्रीत सिंग व सर्वोत्तम गोलरक्षक विकास दहिया यांना प्रत्येकी एक लाख रुपयांचे विशेष इनाम जाहीर करण्यात आले आहे.