अपेक्षेप्रमाणे यजमान भारताने पुरुष व महिला या दोन्ही गटात आपल्या प्रतिस्पर्धी संघांचा धुव्वा उडवत जागतिक हॉकी लीगमध्ये दिमाखदार प्रारंभ केला. पुरुष गटात भारताने फिजी संघाला १६-० असे हरविले, तर महिलांनी कझाकिस्तानवर ८-० अशी मात केली.
मेजर ध्यानचंद स्टेडियमवर सोमवारपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत भारताने फिजी संघाविरुद्ध निर्विवाद वर्चस्व गाजवले. सामन्याच्या तिसऱ्या मिनिटाला भारताने गोल करण्याचा धडाका सुरू केला आणि तो अखेपर्यंत ठेवला. ड्रॅगफ्लिकर व्ही. आर. रघुनाथने तीन गोल केले, तर दानिश मुज्तफा यानेही तेवढेच गोल करत संघाच्या विजयात महत्त्वाचा हातभार लावला. रुपिंदरपाल सिंग व आकाशदीप सिंग यांनी प्रत्येकी दोन गोल केला. गुरजिंदर सिंग, कोठाजित सिंग, मनप्रित सिंग, मलक सिंग, चांगलेनासाना सिंग, धरमवीर सिंग यांनीही फिजीच्या कमकुवत बचावाचा फायदा घेत प्रत्येकी एक गोल आपल्या नावावर केला.
 महिलांमध्ये कझाकिस्तानविरुद्ध भारताने मध्यंतराला ४-० अशी आघाडी घेतली होती. या सामन्यावर पूर्ण वेळ भारताचेच वर्चस्व होते. भारताला तब्बल १५ पेनल्टी कॉर्नर मिळाले. जसप्रीत कौर हिने आठव्या, २१व्या, ५४व्या व ७०व्या मिनिटाला गोल केले. राणी रामपाल हिने १५व्या, २६व्या व ७०व्या मिनिटाला गोल करीत तिला चांगली साथ दिली. सौंदर्या येंदळा हिनेदेखील एक गोल केला. अन्य सामन्यात, मलेशियाने रशियावर ३-१ अशी मात केली, तर जपानने फिजी संघाचा १४-० असा धुव्वा उडविला.