नवी दिल्ली : पुढील आठवड्यात होणाऱ्या आशिया चषक हॉकी स्पर्धेसाठी भारतीय संघात कोणतेही मोठे बदल करण्यात आलेले नाहीत. स्पर्धेसाठी १८ सदस्यीय संघाची बुधवारी घोषणा करताना मध्यरक्षक राजिंदर सिंग, आक्रमकपटू शिलानंद लाक्रा आणि दिलप्रीत सिंग यांचे स्थान कायम राहिले आहे.

आशिया चषक हॉकी स्पर्धा २९ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर या कालावधीत बिहारच्या राजगीर येथे होणार आहे. विजेत्या संघाला पुढील वर्षी होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेत थेट प्रवेश मिळणार आहे. भारतीय संघाचे नेतृत्व हरमनप्रीत सिंगकडे कायम ठेवण्यात आले असून, सध्या सुरू असलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी निवडलेल्या संघातील खेळाडूंचाच आशिया चषकासाठी विचार करण्यात आला.

राजिंदर हा समशेर सिंगची जागा घेईल. अलीकडेच निवृत्त झालेल्या ललित उपाध्यायच्या जागी शिलानंद लाक्राला पसंती देण्यात आली, तर गुरजंत सिंगच्या जागी दिलप्रीतवर विश्वास दाखवण्यात आला. भारतीय संघात अनुभवाला प्राधान्य देण्यात आले आहे. स्पर्धेत भारताचा ‘अ’ गटात समावेश असून, जपान, चीन, कझाकस्तान हे गटातील अन्य संघ आहेत.

‘‘आम्ही अनुभवी संघ निवडला असून, आंतरराष्ट्रीय स्तरावरील दडपणाचा सामना कसा करायचा हे प्रत्येक खेळाडूला चांगले माहित आहे. मी संघाबाबत समाधानी आहे. सर्व आघाड्यांवर संतुलन राखण्यात आल्यामुळे मिळणारी सामूहिक ताकद मला महत्त्वाची वाटते,’’ असे मत मुख्य प्रशिक्षक क्रेग फुल्टन यांनी व्यक्त केले.

भारतीय संघ गोलरक्षक : क्रिशन पाठक, सूरज करकेरा; बचावपटू : सुमीत, जरमनप्रीत सिंग, संजय, हरमनप्रीत सिंग, अमित रोहिदास, जुगराज सिंग; मध्यरक्षक : राजिंदर सिंग, राज कुमार पाल, हार्दिक सिंग, मनप्रीत सिंग, विवेक सागर प्रसाद; आक्रमक : मनदीप सिंग, शिलानंद लाक्रा, अभिषेक, सुखजीत सिंग, दिलप्रीत सिंग; राखीव : नीलम झेस, स्लेव कार्ती.