पेनल्टी कॉर्नरसारखी हुकमी संधी आठ वेळा गमावूनही भारताने ओमानविरुद्ध ७-० असा विजय मिळविला आणि पुरुषांच्या हॉकीत अपराजित्व राखले. या सामन्यात किमान एक डझन गोलने विजय मिळविण्याची संधी भारताला साधता आली नाही. रुपिंदर पाल सिंग याला झालेली दुखापत भारतासाठी चिंतेची बाब आहे.
ड्रॅग फ्लिकर व्ही. आर. रघुनाथने आठ पेनल्टी कॉर्नर वाया घालविले, अन्यथा चित्र वेगळे दिसले असते. भारताकडून रुपिंदरने १८व्या व १९व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरद्वारा गोल केले, तर रघुनाथने ३९व्या व ६०व्या मिनिटाला गोल नोंदविले. त्याने हे गोल अनुक्रमे पेनल्टी स्ट्रोक व पेनल्टी कॉर्नरद्वारा केले. आकाशदीप सिंग (३३वे मिनिट), रमणदीप सिंग (५४वे मिनिट) व दानिश मुज्ताबा (५९वे मिनिट) यांनी प्रत्येकी एक गोल करीत संघाच्या विजयास हातभार  लावला.
 रुपिंदरने ओमानविरुद्ध स्वत:चा दुसरा गोल केल्यानंतर त्याला दुखापतीमुळे मैदान सोडावे लागले. त्यानंतर तो उर्वरित ४१ मिनिटांच्या खेळात सहभागी झाला नाही. आता भारताची पुढील लढत २५ सप्टेंबर रोजी पाकिस्तानशी होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian mens hockey team beats oman by 7
First published on: 24-09-2014 at 12:50 IST