भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलियात कसोटी सामन्यांची मालिका खेळतो आहे. ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारत २-१ ने आघाडीवर आहे. आतापर्यंतच्या कसोटी सामन्यांमध्ये भारतीय गोलंदाजांनी सर्वांना आपली दखल घ्यायला भाग पाडलं आहे. ऑस्ट्रेलियन खेळपट्ट्यांवर दोनवेळा प्रतिस्पर्धी संघ बाद करण्यामध्ये भारतीय गोलंदाजांना यश आलंय. त्यांच्या या कामगिरीवर भारताचे माजी कर्णधार कपिल देव चांगलेच खूश आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चेन्नईत एका कार्यक्रमात आलेले असताना कपिल देव यांना भारतीय संघाच्या जलदगती गोलंदाजांच्या कामगिरीबद्दल विचारलं असता ते म्हणाले, ” गेल्या वर्ष ते दीड वर्षात आपल्या गोलंदाजांनी सुरेख मारा केला आहे. यासाठी मी वेगळं काही सांगण्याची गरज नाही, ते आपली सर्वोत्तम कामगिरी करत आहेत. माझ्यासाठी हे अविश्वसनीय आहे.” याचवेळी विराट कोहलीच्या आक्रमक स्वभावाबद्दल प्रश्न विचारला असता कपिल देव यांनी विराटची पाठराखण केली. जोपर्यंत संघ सामना जिंकतो आहे तोपर्यंत असे मुद्दे फारसे विचारात घेतले जात नाही असं कपिल देव यांनी म्हटलं.

सिडनी कसोटी सामन्यात विजय किंवा सामना अनिर्णित राखण्यामध्ये भारतीय संघ यशस्वी झाला तरीही तो मालिकेत विजयी ठरणार आहे. प्रदीर्घ काळापासून भारतीय संघ ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकू शकलेला नाहीये. विराट कोहलीच्या भारतीय संघाला ही कामगिरी करण्याची संधी आलेली आहे, त्यामुळे सिडनी कसोटीत भारतीय संघाच्या कामगिरीकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian pace attacks performance unbelievable says kapil
First published on: 03-01-2019 at 06:49 IST