पीटीआय, मुंबई

चौथ्या प्रयत्नात विजयाचे खाते उघडल्यानंतर मुंबई इंडियन्स संघाच्या कामगिरीत सातत्य राखण्याचे लक्ष्य असून आज, गुरुवारी इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटमध्ये घरच्या मैदानावर होणाऱ्या सामन्यात त्यांच्यासमोर रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुचे आव्हान असेल.

मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु यांची ‘आयपीएल’मधील सर्वांत लोकप्रिय संघांमध्ये गणना केली जाते. मुंबईकडे रोहित शर्मा, कर्णधार हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमरा, सूर्यकुमार यादव यांसारखे, तर बंगळूरुकडे विराट कोहली, कर्णधार फॅफ ड्यूप्लेसिस, ग्लेन मॅक्सवेल आणि मोहम्मद सिराज यांसारखे तारांकित खेळाडू आहेत. त्यामुळे दोन्ही संघांचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. मात्र, या दोन्ही संघांना यंदाच्या हंगामाची चांगली सुरुवात करता आलेली नाही.

मुंबईला सुरुवातीच्या सलग तीन सामन्यांत पराभव पत्करावा लागला होता. चौथ्या सामन्यात त्यांनी दिल्ली कॅपिटल्सला नमवत यंदाच्या हंगामातील पहिला विजय नोंदवला. दुसरीकडे, बंगळूरुच्या संघाला पाचपैकी चार सामन्यांत हार पत्करावी लागली आहे. त्यांनी एकमेव विजय आपल्या दुसऱ्या सामन्यात पंजाब किंग्जवर मिळवला होता. बंगळूरुचा संघ अद्याप प्रतिस्पर्धी संघाच्या मैदानावर सामना जिंकू शकलेला नाही. तर मुंबईने गेल्या सामन्यात वानखेडे स्टेडियम या आपल्या घरच्या मैदानावरच विजयाची नोंद केली होती. आजचा सामनाही वानखेडेवर होणार असल्याने मुंबईच्या संघाचे पारडे जड मानले जात आहे.

हेही वाचा >>>IPL 2024 मध्ये ‘या’ खेळाडूने प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजांना फोडलाय घाम, ५ डावात फक्त एकदाच झालाय आऊट

मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्याला घरच्या प्रेक्षकांचा पाठिंबा मिळणार का, हे पाहणेही महत्त्वाचे ठरणार आहे. राजस्थान रॉयल्सविरुद्ध झालेल्या घरच्या मैदानावरील पहिल्या सामन्यात हार्दिकला काही चाहत्यांनी लक्ष्य केले होते. दिल्लीविरुद्धच्या सामन्यात मात्र हार्दिकविरोधात शेरेबाजी झाली नव्हती. परंतु, या सामन्यासाठी सेवाभावी संस्थांकडून जवळपास १८ हजार मुले स्टेडियममध्ये आली होती. या मुलांनी मुंबईच्या संघाला मोठा पाठिंबा दिला. आता बंगळूरुविरुद्धही प्रेक्षकांच्या पाठिंब्याची हार्दिकला आशा असेल.

कोहली विरुद्ध बुमरा द्वंद्व

बंगळूरुचा तारांकित फलंदाज विराट कोहली आणि मुंबईचा तारांकित वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा हे सध्या पूर्ण लयीत आहेत. त्यामुळे त्यांच्यातील द्वंद्वाकडे सर्वांचे लक्ष असेल. कोहलीने गेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सविरुद्ध नाबाद शतक साकारले होते. त्याने यंदाच्या हंगामात सर्वाधिक ३१६ धावा केल्या आहेत. मात्र, त्याला बंगळूरुच्या अन्य फलंदाजांची साथ लाभलेली नाही. विशेषत: ग्लेन मॅक्सवेल आणि कॅमरुन ग्रीन यांची कामगिरी बंगळूरुसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. त्यामुळे ग्रीनला वगळून आक्रमक फलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या विल जॅक्सला खेळवण्याचा विचार बंगळूरुचे संघ व्यवस्थापन करू शकेल.

हेही वाचा >>>IPL 2024 : ‘त्याच्यामध्ये अजूनही अहंकार आहे…’, ऑस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूचे रियान परागबद्दल मोठं वक्तव्य

रोहित, सूर्यकुमारवर नजर

माजी कर्णधार रोहित शर्माने गेल्या सामन्यात दिल्लीविरुद्ध मुंबई इंडियन्सला आक्रमक सुरुवात करून दिली होती. त्याने २७ चेंडूंत ४९ धावा फटकावल्या होत्या. रोहितला चारपैकी दोन सामन्यांत ४० धावांचा टप्पा ओलांडण्यात यश आले आहे, पण तो अद्याप अर्धशतक करू शकलेला नाही. त्याच्याकडून मोठ्या खेळीची मुंबईला अपेक्षा असेल. तडाखेबंद फलंदाज सूर्यकुमार यादवने दुखापतीतून सावरत गेल्या सामन्यातून पुनरागमन केले. मात्र, त्याला भोपळाही फोडता आला नाही. तो या सामन्यात कशी कामगिरी करतो याकडे चाहत्यांची नजर असेल. गेल्या सामन्यात फटकेबाजी करणारा रोमारियो शेफर्ड आणि टीम डेव्हिड यांच्याकडूनही अपेक्षा वाढल्या आहेत.

● वेळ : सायं. ७.३० वा.

● थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी, जिओ सिनेमा अॅप