Rishabh Pant On Turning Point Of India vs South Africa Match: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेल्या २ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला दारूण पराभवाचा सामना करावा लागला आहे. भारतीय संघाकडे सहज विजय मिळवण्याची संधी होती. पण दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी दमदार गोलंदाजी करून भारतीय संघाच्या तोंडचा घास पळवला. अवघ्या १२४ धावांचा पाठलाग करत असलेला भारतीय संघाचा डाव ९३ धावांवर आटोपला. त्यामुळे भारतीय संघाला हा सामना ३० धावांनी गमवावा लागला. दरम्यान सामना झाल्यानंतर गिलच्या अनुपस्थितीत भारतीय संघाचं नेतृत्व करत असलेल्या ऋषभ पंतने पराभवाचं नेमकं कारण सांगितलं आहे.

सामन्यानंतर बोलताना ऋषभ पंतने पराभवाचं कारण सांगत, सामना नेमका कुठे फिरला याबाबत भाष्य केलं. तो म्हणाला, “अशा सामन्याबद्दल जास्त विचार करत बसण्यात काहीच अर्थ नाही. आम्ही हे लक्ष्य सहज पूर्ण करायला हवं होतं. दुसऱ्या डावात आमच्यावरील दबाव आणखी वाढत गेला. त्यामुळे आम्ही संधीचा फायदा घेऊ शकलो नाही.” असं पंत म्हणाला.

सामन्यातील टर्निंग पॉईंटबद्दल बोलताना पंत म्हणाला, “तेंबा आणि बॉशने महत्वपूर्ण भागीदारी केली. या भागीदारीमुळे ते सामन्यात परतले आणि हाच या सामन्यातील टर्निंग पॉईंट ठरला. खेळपट्टीतून मदत मिळत होती. १२० धावसंख्याही धोकादायक ठरू शकते. पण एक संघ म्हणून आम्ही हा दबाव पचवून संधीचं सोनं करायला हवं होतं.”

या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव अवघ्या १५९ धावांवर आटोपला. भारतीय संघाकडून जसप्रीत बुमराह हिरो ठरला होता. त्याने या डावात गोलंदाजी करताना ५ गडी बाद केले होते. त्यानंतर पहिल्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघालाही हवी तशी कामगिरी करता आली नाही. भारतीय संघाचा पहिला डाव अवघ्या १८९ धावांवर आटोपला. भारतीय संघाला पहिल्या डावात ३० धावांची आघाडी मिळाली.

दुसऱ्या डावातही दक्षिण आफ्रिकेचा डाव कोलमडला होता. दुसऱ्या दिवसाअखेर दक्षिण आफ्रिकेचे ७ फलंदाज माघारी परतले होते. तिसऱ्या दिवशी भारतीय संघाकडे दक्षिण आफ्रिकेचा डाव स्वस्तात गुंडाळण्याची संधी होती. पण तेंबा बावुमाने अर्धशतकी खेळी केली आणि कॉर्बिन बॉशसोबत मिळून महत्वपूर्ण भागीदारी करत दक्षिण आफ्रिकेची धावसंख्या १५३ धावांपर्यंत पोहोचवली. भारतीय संघाला हा सामना जिंकण्यासाठी १२४ धावा करायच्या होत्या. पण भारतीय संघाचा डाव अवघ्या ९३ धावांवर आटोपला.