जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम फेरी आणि इंग्लंड दौऱ्यासाठी शुक्रवारी भारताच्या कसोटी संघाची घोषणा करण्यात आली. दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतून मध्यातच माघार घेणारा रवींद्र जडेजा, हनुमा विहारी यांसह अनेक खेळाडूंचे भारतीय संघात पुनरागमन झाले आहे. मात्र अष्टपैलू हार्दिक पंड्या आणि युवा सलामीवीर पृथ्वी शॉ यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. साऊदम्पटन येथे १८ ते २२ जूनदरम्यान भारत-न्यूझीलंड यांच्यात जागतिक कसोटी अजिंक्यपदाची अंतिम लढत रंगणार आहे. त्यानंतर ४ ऑगस्टपासून भारत-इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे. चेतन शर्मा यांच्या अध्यखतेखालील राष्ट्रीय निवड समितीने ही संघनिवड केली. वेगवान गोलंदाज नवदीप सैनी आणि फिरकीपटू कुलदीप यादव यांना भारतीय संघात स्थान लाभलेले नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 

सलामीवीर के. एल. राहुल आणि यष्टीरक्षक वृद्धीमान साहा यांना संघात स्थान देण्यात आले असले, तरी प्रत्यक्षात इंग्लंडला रवाना होण्यापूर्वी त्यांची तंदुरुस्ती चाचणी घेतली जाणार आहे. पोटावर शस्त्रक्रिया झाल्यामुळे राहुलला आयपीएलमधील पंजाब किंग्जच्या अखेरच्या लढतीला मुकावे लागले, तर सनरायजर्स हैदराबादकडून खेळणाऱ्या साहाला आयपीएलदरम्यानच करोनाची लागण झाली.

हार्दिकची गोलंदाजी इंग्लंडच्या खेळपट्ट्यांवर उपयुक्त ठरू शकली असती. परंतु २७ वर्षीय हार्दिक अद्यापही गोलंदाजी करण्याइतपत पूर्णपणे तंदुरुस्त झालेला नाही. त्यामुळे फक्त फलंदाजीच्या बळावर त्याला कसोटी संघात स्थान मिळणे कठीणच आहे. मुंबईच्या २१ वर्षीय पृथ्वीने मात्र ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अपयशानंतर स्थानिक स्पर्धा आणि आयपीएलमध्ये सातत्याने धावा केल्या. परंतु त्याला संघातील पुनरागमनासाठी अधिक काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian squad for world cup final and series against england announced akp
First published on: 08-05-2021 at 00:01 IST