मनामा (बहारीन) भारताच्या रामकुमार रामनाथनने एटीपी चॅलेंजर टेनिस स्पर्धेचे पहिलेवहिले जेतेपद पटकावले. त्याला या जेतेपदासाठी कारकीर्दीत तब्बल १२ वर्षे वाट पाहावी लागली.

सहाव्या मानांकित रामकुमारने मनामा येथे झालेल्या स्पर्धेतील (एटीपी ८० दर्जा) एकेरीच्या अंतिम सामन्यात रशियाच्या एव्हग्नी कार्लोव्स्कीला ६-१, ६-४ अशी धूळ चारली. त्याला याआधी कारकीर्दीत सहा वेळा चॅलेंजर स्पर्धाच्या उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. २७ वर्षीय रामकुमारने मनामा येथे झालेल्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मात्र उत्कृष्ट खेळ केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्याच्या आक्रमक सव्‍‌र्हिसचे कार्लोव्स्कीला प्रत्युत्तर देता आले नाही. त्यामुळे पहिला सेट त्याने ६-१ असा मोठय़ा फरकाने जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये कार्लोव्स्कीने खेळात सुधारणा केली; पण रामकुमारने त्याला सामन्यात पुनरागमन करण्याची संधी दिली नाही. या कामगिरीमुळे रामकुमारने ८० गुणांची कमाई केली असून जागतिक एकेरी क्रमवारीत तो अव्वल २०० खेळाडूंमध्ये प्रवेश मिळवू शकतो.