पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंच्या प्रभावी कामगिरीचे कौतुक केले होते. त्यानंतर आज १६ ऑगस्ट रोजी पंतप्रधानांनी त्यांच्या निवासस्थानी खेळाडूंची भेट घेतली आणि एकत्र नाश्ता केला. भारतीय खेळाडूंनी टोक्यो ऑलिम्पिकमध्ये एका सुवर्णासह सात पदके जिंकली. ही भारताची आतापर्यंतची ऑलिम्पिकमधील सर्वोत्तम कामगिरी आहे. नीरज चोप्राने भालाफेकमध्ये सुवर्णपदक जिंकले, जे भारताचे अॅथलेटिक्समधील पहिले पदक ठरले.

नाश्त्यादरम्यान मोदींनी चोप्रा आणि पी. व्ही. सिंधू यांच्याशी संवाद साधला. दोन ऑलिम्पिक पदके जिंकणारी सिंधू दुसरी भारतीय आणि पहिली महिला खेळाडू आहे. तिने रिओ ऑलिम्पिक २०१६ मध्ये जिंकलेले रौप्यपदकही तिच्यासोबत आणले. पंतप्रधानांनी ४१ वर्षांनंतर ऑलिम्पिकमध्ये भारताला हॉकी पदक मिळवून देणाऱ्या पुरुष हॉकी संघाशीही संवाद साधला. सर्व खेळाडूंनी स्वाक्षरी केलेले हॉकी स्टिक्स संघाने पंतप्रधानांना सादर केले. पंतप्रधानांनी कर्णधार मनप्रीत सिंग यांच्याशीही चर्चा केली.

 

हेही वाचा – Afghanistan Crisis : स्टार क्रिकेटपटू राशिद खान आणि मोहम्मद नबी IPL 2021 खेळणार?

मोदींनी ऑलिम्पिकमधून दोन पदके घेऊन परतलेल्या कुस्ती संघाशीही संवाद साधला. ऑलिम्पिकमध्ये कुस्तीपटू रवी दहियाला रौप्य आणि बजरंग पुनियाला कांस्यपदक मिळाले. शिस्तीच्या कारणास्तव निलंबित झालेली कुस्तीगीर विनेश फोगाट, सीमा बिस्ला, अंशु मलिक आणि प्रशिक्षक जगमंदर सिंह यावेळी उपस्थित होते.

मीराबाई चानूने पहिल्याच दिवशी रौप्यपदक जिंकून भारताच्या मोहिमेची सुरुवात केली. बॉक्सर लव्हलिना बोर्गोहेनने कांस्यपदक जिंकले. भारतीय महिला हॉकी संघाने अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी करून प्रथमच ऑलिम्पिक उपांत्य फेरीत प्रवेश केला.