भारतीय महिला हॉकी संघाने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. भारतीय संघाने ऑस्ट्रेलियन संघाला १-० च्या फरकाने पराभूत करुन उपांत्यफेरीत प्रवेश केलाय. भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला पराभूत करण्याआधीच आयर्लंड आणि दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करण्याची किमया साधली होती. ४१ वर्षांच्या इतिहासात प्रथमच भारतीय महिला संघाने ऑलिम्पिकमध्ये इतकी चमकदार कामगिरी केलीय. तीन वेळा विश्वविजेता ठरलेल्या ऑस्ट्रेलियन संघाला पराभूत करण्याचा भीमपराक्रम भारतीय महिलांना करुन दाखवत मोठ्या थाटात उपांत्यफेरीत प्रवेश केलाय.

दरम्यान भारतीय महिला हॉकी संघावर देशभरातून अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत. खासदार किरेन रिजिजू, युवा कार्य आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी महिला हॉकी संघाचे अभिनंदन केले आहे.

आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, टीम इंडियाच्या कामगिरीचा सर्वांना अभिमान आहे. काही विजय खूप संस्मरणीय असतात, तुम्हाला खेळताना पाहणे हा आमच्यासाठी एक चांगला अनुभव आहे.

क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले, महिला हॉकी संघाने इतिहास रचला आहे. संघाने प्रथमच उपांत्य फेरी गाठली आहे. देशातील १३० कोटी लोक देशाच्या महिला हॉकी संघासोबत आहेत.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ट्वीट करून लिहिले की, भारतीय महिला हॉकी संघाने टोक्यो ऑलिम्पिकमध्ये अप्रतीम कामगिरी करून प्रथमच ऑलिम्पिकच्या उपांत्य फेरीत प्रवेश निश्चित केला आहे. संपूर्ण देशाला अभिमान मिळवून देणाऱ्या या ऐतिहासिक कामगिरीसाठी संपूर्ण टीमचे हार्दिक अभिनंदन, मी देवाकडे प्रार्थना करतो की तुमच्या यशाचा हा क्रम असाच चालू राहो.