‘एनबीए’ इंडिया स्पर्धा-२०१९
प्रेक्षकांचा सळसळता उत्साह, प्रत्येक बास्केटला मिळणारी उत्स्फूर्त दाद, टाळ्या-शिटय़ांचा कडकडाट यामुळे मुंबईकरांनी नॅशनल बास्केटबॉल असोसिएशनच्या ‘एनबीए इंडिया स्पर्धा-२०१९’च्या दुसऱ्या सामन्याचाही मनमुराद आनंद लुटला. शनिवारी मात्र थरारक, रोमहर्षक सामन्याचा अनुभव घेता आला नसला तरी इंडियाना पेसर्सने सॅक्रॅमेंटो किंग्जचे आव्हान १३०-१०६ असे सहज परतवून लावले आणि भारतात पहिल्यांदाच रंगलेल्या दोन्ही सामन्यांवर आपली विजयीमुद्रा उमटवली.
शुक्रवारी पहिल्या सामन्याला रिलायन्स फाऊंडेशनच्या उपक्रमांतर्गत जवळपास ३५०० शालेय विद्यार्थ्यांनी ‘एनबीए’चा आनंद घेतला होता. पण शनिवारी वर्षांनुवर्षे ‘एनबीए’चा थरार अनुभवणाऱ्या दर्दी बास्केटबॉल चाहत्यांनी हजेरी लावली होती. त्यामुळे सुरुवातीपासूनच वरळीच्या एनएससीआय स्टेडियमवर एक वेगळ्याच प्रकारची ऊर्जा संचारली होती. त्यातच इंडियाना पेसर्सने पहिल्यापासूनच घेतलेली आघाडी अखेपर्यंत टिकवत सामन्यावर वर्चस्व गाजवले तरी त्याचा चाहत्यांच्या उत्स्फूर्त पाठिंब्यावर कोणताच परिणाम झाला नाही.
इंडियाना पेसर्सने सुरुवातीलाच तीन गुणांची कमाई करत दमदार सुरुवात केली होती. पण सॅक्रॅमेंटो किंग्जने दोन वेळा बास्केट करत पाच गुण मिळवले. पण पेसर्सनी तीन गुणांचा बास्केट करत ८-५ अशी आघाडी घेतली. पहिल्या सत्रात सॅक्रॅमेंटो किंग्जने ३०-२५ अशी आगेकूच केली होती.
दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या सत्रात मात्र पेसर्सचा बोलबाला पाहायला मिळाला. खेळाडूंमध्ये बदल करत पेसर्सने नव्या दमाच्या बास्केटबॉलपटूंना मैदानात उतरवले. त्यानंतर बास्केटचा धडाका लावत पेसर्सनी ५३-४३ अशी १० गुणांची महत्त्वपूर्ण आघाडी घेतली होती. दुसऱ्या सत्राच्या अखेपर्यंत त्यांनी ही ७१-५९ अशी कायम ठेवली होती. तिसऱ्या सत्रात ९६-८१ अशी आणि अखेरीस १३०-१०६ अशी बाजी मारत पेसर्सने आपल्या वेगवान खेळाने सॅकॅ्रमेंटो किंग्जला नामोहरम केले. पेसर्सकडून अलिझ जॉन्सनने १७ गुण मिळवत आपली छाप पाडली. त्याला आरोन हॉलिडे (१६ गुण) आणि जकार सॅम्पसन (१५ गुण) यांनी चांगली साथ दिली. सॅक्रॅमेंटो किंग्जकडून बडी हाइल्डने (१७ गुण) कडवी लढत दिली.
सेलिब्रिटींची मांदियाळी
‘एनबीए इंडिया स्पर्धा-२०१९’च्या शुक्रवारी झालेल्या सामन्याकडे बॉलीवूड क्षेत्रातील सेलिब्रिटींनी पाठ फिरवली होती. मात्र शनिवारी वरळीच्या एनएससीआय स्टेडियमवर जणू बॉलीवूडचे तारांगणच अवतरले. बॉलीवूडची ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्रा, अभिनेत्री परिणिती चोप्रा, तमन्ना भाटिया, नितू चंद्रा, शिबानी दांडेकर, नेहा धूपिया तसेच अभिनेता फरहान अख्तर, केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू, खासदार पूनम महाजन, गायक गुरू रंधवा, टेनिसपटू लिएंडर पेस, अभिनेता अंगद बेदी आणि रणविजय सिंग यांनी हजेरी लावत ‘एनबीए’चा थरार अनुभवला.