भारतीय संघाने गुरुवारी नवी मुंबईतल्या डीवाय पाटील स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध विक्रमी विजय मिळवत इतिहास घडवला. ३३८ धावांचं प्रचंड लक्ष्य पार करत भारताने गतविजेत्या ऑस्ट्रेलियाला चीतपट केलं. या विजयाने २००६ साली ऑस्ट्रेलियाला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अनपेक्षित पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. त्या सामन्याच्या आठवणी क्रिकेटप्रेमींच्या मनात दाटल्या. हा सामना ४३४ या आकड्यानिशी ओळखला जातो. ऑस्ट्रेलियाने केलेला सर्वाधिक धावांचा विक्रम दक्षिण आफ्रिकेने साडेतीन तासात मोडीत काढला होता.
ऑस्ट्रेलियाचा संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर होता. वनडे मालिकेतला शेवटचा सामना जोहान्सबर्गच्या वॉँडरर्स मैदानावर होता. ऑस्ट्रेलियाने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना न भूतो न भविष्यती असा ४३४ धावांचा पर्वतच रचला. कर्णधार रिकी पॉन्टिंगने १३ चौकार आणि ९ षटकारांसह १६४ धावांची खेळी साकारली. सायमन कॅटिचने ७९ तर अॅडम गिलख्रिस्टने ५५ धावा केल्या होत्या. माईक हसीने ९ चौकार आणि ३ षटकारांसह ८१ धावांची खेळी केली. अँड्यू सायमंड्सने हात धुवून घेत १३ चेंडूत २७ धावा चोपल्या. ऑस्ट्रेलियाने सर्वाधिक धावांचा विक्रम नावावर केला. दक्षिण आफ्रिकेच्या प्रत्येक गोलंदाजांच्या ठिकऱ्या उडवत ऑस्ट्रेलियाने धावांची टांकसाळच उघडली. पहिला डाव झाल्यानंतर अनेकांनी टीव्ही बंद केले. सामना पाहणं सोडून दिलं आणि कामाला लागले.
मध्यंतरावेळी दक्षिण आफ्रिकेचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू जॅक कॅलिस असं म्हणाला की ऑस्ट्रेलियाला २० धावा कमी पडल्या आहेत. त्यावेळी कॅलिसच्या बोलण्याचं सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं. कारण ३०० चेंडूत ४३४ धावा करणं हेच मुळात अविश्वसनीय होतं. पण कॅलिसचं म्हणणं ३ तासात खरं ठरलं. कारण दक्षिण आफ्रिकेने अद्भुत फटकेबाजी करत विजय मिळवला. जे घडतंय ते खरं आहे का असं वाटावं अशा पद्धतीने चौकार, षटकारांची लयलूट झाली. कर्णधार ग्रॅमी स्मिथने ९० धावा कुटल्या. त्याचा सहकारी हर्षेल गिब्जने २१ चौकार आणि ७ षटकारांसह १७५ धावांची खेळी साकारली. गिब्जच्या खेळीनेच आफ्रिकेच्या विजयाचा पाया रचला. मार्क बाऊचरने नाबाद ५० धावांची खेळी करत आफ्रिकेच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. जोहान वॉन डर वॅथने ३५ करत बाऊचरला चांगली साथ दिली.
क्रिकेटच्या इतिहासातला सगळ्यात रोमहर्षक आणि चित्तथरारक सामना अशी याची नोंद होते. आजही युट्यूबवर या सामन्याच्या हायलाईट्स पाहणारे क्रिकेटरसिक जगभर आहेत. भारताच्या विजयाने ४३४ सामन्याच्या आठवणी जागा झाल्या. ऑस्ट्रेलियाने सेमी फायनलसारख्या दडपणाच्या लढतीत ३३८ धावांची मजल मारली. भारताने जेमिमा रॉड्रिग्जच्या शतकाच्या बळावर ५ विकेट्स आणि ९ चेंडू राखून हे लक्ष्य गाठलं. महिला क्रिकेटमध्ये वनडेतला धावांचा पाठलाग करतानाची ही सर्वोच्च धावसंख्या आहे.
