पीटीआय, जकार्ता

भारताचे आघाडीचे बॅडमिंटनपटू एच. एस. प्रणॉय आणि किदम्बी श्रीकांत यांना इंडोनेशिया मास्टर्स स्पर्धेत (सुपर ५०० दर्जा) पहिल्याच फेरीत आपले आव्हान गमवावे लागले. त्याच वेळी लक्ष्य सेन आणि किरण जॉर्ज यांनी मात्र विजयी सलामी दिली.

जागतिक क्रमवारीत आठव्या स्थानावर असलेल्या प्रणॉयला सलामीच्या लढतीत अपेक्षित यश मिळाले नाही. माजी जगज्जेत्या सिंगापूरच्या लोह कीन येवकडून तीन गेमच्या लढतीत प्रणॉयला २१-१८ , १९-२१, २१-१० असा पराभव पत्करावा लागला. प्रणॉय गेल्याच आठवडय़ात इंडियन खुल्या स्पर्धेच्या उपांत्य फेरीपर्यंत पोहोचला होता. प्रणॉयच्या पाठोपाठ श्रीकांतचेही आव्हान संपुष्टात आले. मलेशियाच्या ली झी जियाने श्रीकांतला १९-२१, २१-१४, २१-११ असे पराभूत केले. ही लढत ५४ मिनिटे चालली.

हेही वाचा >>>पाकिस्तानी वंशाचा इंग्लंडचा फिरकीपटू शोएब बशीरला अखेर व्हिसा मंजूर

जागतिक क्रमवारीत १९व्या स्थानावर असलेल्या लक्ष्य सेनने मात्र स्पर्धेची यशस्वी सुरुवात केली. लक्ष्यने चीनच्या वेंग हाँग यांग याचा २४-२२, २१-१५ असा सरळ गेममध्ये पराभव केला. लक्ष्यला मलेशिया खुल्या स्पर्धेत वेंगकडूनच पहिल्या फेरीत पराभवाचा सामना करावा लागला होता. दोन वर्षांपूर्वी ओडिशा आणि डेन्मार्क मास्टर्स स्पर्धेत विजेतेपद मिळवणाऱ्या किरण जॉर्जने बुधवारी पहिला गेम गमाविल्यानंतर फ्रान्सच्या तोमा पोपोवला १८-२१, २१-१६, २१-१९ असे नमवले. किरणने मंगळवारी पात्रता फेरीत दोन लढती जिंकून मुख्य फेरीत प्रवेश केला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.