सायना नेहवालला यंदाच्या हंगामात विजेतेपदाने कायम हुलकावणी दिली आहे. मात्र रिओ ऑलिम्पिकला आत्मविश्वासाने सामोरे जाण्याच्या निर्धाराने सोमवारपासून सुरू होणाऱ्या इंडोनेशिया खुल्या सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेच्या जेतेपदासाठी ती उत्सुक आहे.
पायाच्या घोटाला झालेल्या दुखापतीमुळे यंदाच्या हंगामात सायनाला अनेक स्पर्धाना मुकावे लागले. मात्र त्यातून सावरत तिने आपली कामगिरी सुधारण्याचा प्रयत्न केला आहे. इंडिया, मलेशिया आणि आशियाई अजिंक्यपद या मानाच्या स्पर्धामध्ये ती उपांत्य फेरीपर्यंत पोहोचली होती.
उबेर चषक स्पध्रेत भारतीय महिला संघाने कांस्यपदकाची कमाई केली. या वाटचालीत सायनाने साखळीतील सर्व सामने जिंकले. मात्र बाद फेरीत थायलंडची रॅटचानोक इन्टॅनॉन आणि चीनच्या लि झुरूईकडून ती पराभूत झाली.
सायनाने इंडोनेशिया खुल्या स्पध्रेत २००९, २०१० आणि २०१२मध्ये विजेतेपदाला गवसणी घातली होती. या स्पध्रेतील चौथ्या विजेतेपदाच्या ईष्रेने उतरणाऱ्या सायनाची मंगळवारी चायनिज तैपेईच्या पै यू पो हिच्याशी सलामीची लढत होणार आहे.
रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेली ज्वाला गट्टा आणि अश्विनी पोनप्पा जोडीचा सामना इंडोनेशियाच्या फेब्रियाना द्विपुजी कुसुमा आणि रिबका सुगीआर्तो जोडीशी होणार आहे. पुरुष दुहेरीत मनू अत्री आणि बी. सुमित रेड्डी जोडी फिलिपाइन्सच्या पीटर गॅब्रिएल मॅगनाये आणि अॅल्विन मोरादा या जोडीशी सामना करणार आहे.
दिग्गज भारतीय खेळाडूंची माघार
इंडोनेशिया खुल्या स्पध्रेतून भारताच्या अनेक दिग्गज भारतीय खेळाडूंनी माघार घेतली आहे. गेल्या महिन्याभरातील प्रदीर्घ प्रशिक्षण कार्यक्रमामुळे पी. व्ही. सिंधू या स्पध्रेत खेळू शकणार नाही. पुरुष एकेरीत के. श्रीकांत आणि अजय जयराम हेसुद्धा या स्पध्रेत खेळणार नाही. पी. कश्यपच्या दुखापतीवर सध्या उपचार सुरू आहे. एच. एस. प्रणॉयने पायाच्या बोटाला झालेल्या दुखापतीमुळे या स्पध्रेत न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. बी. साई प्रणीत आणि आरएमव्ही गुरुसाइदत्त हे दोघेही या स्पध्रेत खेळू शकणार नाहीत.
संग्रहित लेख, दिनांक 30th May 2016 रोजी प्रकाशित
हंगामातील पहिल्यावहिल्या जेतेपदासाठी सायना उत्सुक
सायना नेहवालला यंदाच्या हंगामात विजेतेपदाने कायम हुलकावणी दिली आहे.

First published on: 30-05-2016 at 03:27 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indonesia open saina nehwal hopes to grab first title of season