India vs New Zealand LIVE Cricket Score Updates, Women’s World Cup: महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ मध्ये भारत आणि न्यूझीलंड महिला संघांमध्ये आज करो या मरो सामना खेळवला जात आहे. वर्ल्डकप सेमीफायनलच्या दृष्टीने दोन्ही संघांसाठी हा सामना जिंकणं महत्त्वाचं असणार आहे. ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडचे संघ आधीच सेमीफायनलसाठी पात्र ठरले आहेत. दरम्यान एका जागेसाठी भारत, न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यात लढत आहे.
भारत-न्यूझीलंड वनडे सामना पुन्हा किती वाजता सुरू होणार?
भारत आणि न्यूझीलंड महिला संघांमधील सामना हा पावसाच्या व्यत्ययामुळे थांबवण्यात आला होता. ७.५० वाजता सामना पुन्हा सुरू होणार असून ४९ षटकांचा सामना खेळवण्यात येईल. तर इनिंग्स ब्रेक हा १० मिनिटांचा असेल.
भारत-न्यूझीलंड सामना ४८व्या षटकानंतर अचानक का थांबवला?
नवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियममध्ये सुरू असलेला सामना ४८व्या षटकात थांबवण्यात आला. अचानक पावसाने जोरदार हजेरी लावल्याने सामन्यात व्यत्यय आला. जेमिमा रोड्रीग्ज उत्तम लयीत असून ती शानदार फटकेबाजी करत ६९ धावांवर खेळत आहे. यासह भारताने ४८ षटकांत २ बाद ३२९ धावा केल्या आहेत.

जेमिमा रोड्रीग्जचं अर्धशतक
जेमिमा रोड्रीग्जने ३८ चेंडूत ७ चौकारांसह वादळी अर्धशतकी खेळी केली. यासह भारताने ४५ षटकांत ३०२ धावा केल्या आहेत.
प्रतिका रावल झेलबाद
अमेलिया करच्या ४३ व्या षटकात मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात प्रतिका रावल झेलबाद झाली. प्रतिकाने बाद होण्यापूर्वी १३३ चेंडूत १३ चौकार आणि २ षटकारांसह १२२ धावा केल्या.
प्रतिका रावलचं शतक
प्रतिका रावलने स्मृती मानधनानंतर आपलं शतक पूर्ण केलं आहे. प्रतिका रावलने १२२ चेंडूत १३ चौकारांसह १०० धावांचा टप्पा गाठला. प्रतिकाचं महिला विश्वचषकातील हे पहिलंच शतक आहे.
स्मृती मानधनाचं शतक
स्मृती मानधनाने ९५ चेंडूत १० चौकार आणि ४ षटकारांसह १०९ धावांची खेळी केली. तर शतकी खेळीनंतर १०९ धावा करत झेलबाद झाली. यासह प्रतिका रावल आणि मानधनाने पहिल्या विकेटसाठी २१२ धावांची भागीदारी रचली.
प्रतिका रावलचं अर्धशतक
स्मृती मानधनापाठोपाठ आता प्रतिका रावलनेदेखील आपलं अर्धशतक पूर्ण केलं आहे. प्रतिकाने ७५ चेंडूत ७ चौकारांसह ५० धावा पूर्ण केल्या. यासह भारतीय संघ २३ षटकांनंतर बिनबाद १३२ धावा करत खेळत आहे.
स्मृती मानधनाचं अर्धशतक
स्मृती मानधनाने न्यूझीलंडविरूद्ध महत्त्वाच्या सामन्यात अर्धशतकी खेळी केली आहे. स्मृती ४९ चेंडूत ४ चौकार आणि २ षटकारांसह आपलं अर्धशतक पूर्ण केलं. यासह प्रतिका रावल आणि स्मृती मानधनाने शतकी भागीदारीही रचली आहे. यासह भारताची धावसंख्या २० षटकांत ११५ धावा आहे.
स्मृत प्रतिकाची ८६ धावांची भागीदारी
स्मृती मानधना आणि प्रतिका रावल यांनी १६ षटकांत ८६ धावांची भागीदारी रचली आहे. यासह भारताला महत्त्वाच्या सामन्यात चांगली सुरूवातही मिळाली आहे. प्रतिका ७ चौकारांसह ३६ धावा तर स्मृती २ चौकार-२ षटकारांसह ३८ धावा करत खेळत आहे. यादरम्यान प्रतिका रावलने तिच्या वनडेमधील एक हजार धावा पूर्ण केल्या आहेत.
११ षटकांत भारताच्या ५० धावा पूर्ण
भारताने प्रथम फलंदाजी करताना ११ षटकांत ५० धावा केल्या आहेत. स्मृती २४ धावा तर प्रतिका २० धावांवर खेळत आहेत.
५ षटकांत भारताने किती धावा केल्या?
भारताकडून स्मृती मानधना आणि प्रतिका रावल ही जोडी सलामीला उतरली आहे. दोघींनी पहिल्या ५ षटकांत बिनबाद १५ धावा केल्या आहेत. जेस केरने एक मेडन षटक टाकलं. तर प्रतिकाने दोन शानदार चौकार एका षटकात खेचले.
भारताची प्लेईंग इलेव्हन
प्रतिका रावल, स्मृती मानधना, हरलीन देओल, हरमनप्रीत कौर (कर्णधार), जेमिमा रॉड्रिग्स, दीप्ती शर्मा, रिचा घोष (यष्टीरक्षक), स्नेह राणा, क्रांती गौड, श्री चरणी, रेणुका सिंग ठाकूर
न्यूझीलंडची प्लेईंग इलेव्हन
सुझी बेट्स, जॉर्जिया प्लिमर, अमेलिया केर, सोफी डेव्हाईन (कर्णधार), ब्रुक हॅलिडे, मॅडी ग्रीन, इसाबेला गेज (यष्टीरक्षक), जेस केर, रोझमेरी मायर, ली ताहुहू, ईडन कार्सन
न्यूझीलंड संघाने जिंकली नाणेफेक
भारत आणि न्यूझीलंड या महत्त्वाच्या सामन्याची नाणेफेक न्यूझीलंड संघाने जिंकली असून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. तर भारतीय संघ फलंदाजीने सामन्याला सुरूवात करेल. भारताच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये या सामन्यासाठी मोठा बदल करण्यात आला असून अमनजोत कौरच्या जागी जेमिमा रोड्रिग्ज सामन्यात खेळताना दिसणार आहेत.
भारत-न्यूझीलंड हेड टू हेड रेकॉर्ड
महिला विश्वचषकात भारत आणि न्यूझीलंड १४ व्यांदा एकमेकांसमोर येणार आहेत. भारताने मागील १३ पैकी १० सामने गमावले आहेत, तर फक्त दोन सामने जिंकले आहेत, तर एक सामना अनिर्णित राहिला आहे.
भारत वि. न्यूझीलंड वर्ल्डकप सामन्यांचा रेकॉर्ड
महिला एकदिवसीय विश्वचषकात न्यूझीलंड नेहमीच भारतापेक्षा वरचढ राहिली आहे. महिला विश्वचषकात ज्या संघांविरुद्ध भारताचा वाईट रेकॉर्ड आहे, त्यामध्ये न्यूझीलंड पहिल्या क्रमांकावर आहे.
भारत-न्यूझीलंड महत्त्वाचा सामना
महिला वनडे वर्ल्डकप २०२५ सेमीफायनलच्या दृष्टीने महत्त्वाचा सामना आज भारत वि. न्यूझीलंड संघांमध्ये खेळवला जात आहे. भारतासाठी आनंदाची बातमी म्हणजे या सामन्यात विजय मिळवल्यास संघ थेट उपांत्य फेरीत प्रवेश मिळेल. पण, न्यूझीलंड जिंकल्यास त्यां ना इतर सामन्यांच्या निकालांवर अवलंबून राहावं लागेल. जर भारतीय संघाने हा सामना गमावला तर त्यांनाही इतर संघांच्या निकालावर अवलंबून राहावं लागलं.