आव्हानं स्वीकारायला आवडतात!

‘गोल्डन ग्लोव्ह’च्या शर्यतीत आघाडीवर असलेल्या सुब्राताशी केलेली ही खास बातचीत.

सुब्राता पॉल भारतीय फुटबॉल गोलरक्षक

 
‘‘आघाडीपटू, मध्यरक्षक आणि बचावपटू असे मिळून दहा जण फुटबॉलच्या एका संघात असतात, परंतु गोलरक्षक एकच असतो. त्यामुळे त्याच्यासमोरील आव्हाने ही दहापटीने अधिक असतात आणि तीच स्वीकारायला मला आवडतात,’’ असे मत भारतीय फुटबॉल संघाचा गोलरक्षक सुब्राता पॉलने व्यक्त केले. भारतीय फुटबॉलमध्ये ‘स्पायडरमॅन’ म्हणून ओळख असलेला सुब्राता इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) मुंबई सिटी एफसी क्लबमधून खेळत आहे. ‘गोल्डन ग्लोव्ह’च्या शर्यतीत आघाडीवर असलेल्या सुब्राताशी केलेली ही खास बातचीत.
खराब सुरुवातीनंतर मुंबई सिटी क्लब विजयपथावर परतला आहे. याबाबत काय सांगशील?
– विजय हा नेहमी हवाहवासा वाटतो. आम्ही दोन पराभव व एका बरोबरीनंतर स्पध्रेत दमदार पुनरागमन केले. त्यामुळे संघात सकारात्मक वातावरण आहे, परंतु जे काही घडून गेले तो भूतकाळ आहे आणि त्यात न रमणे हे उचित ठरेल.
आता सातत्य राखण्याचे आव्हान तुम्हाला पेलावे लागणार आहे. त्यासाठी संघाची तयारी कशी सुरू आहे?
– आयएसएलसारख्या स्पध्रेत सातत्य हा महत्त्वाचा भाग आहे. कारण अल्प कालावधीत बरेच सामने क्लब्जना खेळावे लागतात आणि त्यामुळे दुखापतीचे प्रमाणही वाढण्याची शक्यता असते. सातत्यपूर्ण खेळ करणारा आणि दुखापतविरहित खेळाडूंचाच संघ जेतेपदासाठी भक्कम दावेदार ठरू शकतो. आमच्याकडे पर्यायी खेळाडूंची फौज असल्यामुळे प्रत्येक सामन्यात आम्ही खेळाडूंची अदलाबदल करून दुखापती टाळू शकतो. ही आमच्यासाठी जमेची बाजू आहे.
तुझा इथवरचा प्रवास कसा झाला?
– फुटबॉलची आवड जोपासता आली, यासाठी स्वत:ला भाग्यवान समजतो. मला फुटबॉल खेळणे आवडते, मग ते तालुका स्तरावरील असो किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरील. मैदानावर असताना मला सर्वाधिक आनंद मिळतो. लहानपणापासूनच या खेळाकडे मी वळलो आणि घरच्यांचाही पाठिंबा होताच. टाटा फुटबॉल अकादमीने माझ्यातील गुणवत्ता हेरली. त्यानंतर मी मागे वळून पाहिलेच नाही.
प्रत्येकाला प्रसिद्धीच्या झोकात राहणे आवडते आणि म्हणूनच फुटबॉलमध्ये प्रत्येक जण आघाडीपटू होण्यास प्राधान्य देतो. तू मात्र गोलरक्षक होण्याचा निर्णय घेतलास?
– फुटबॉल जेव्हापासून कळू लागले, तेव्हापासून मी गोलरक्षक होण्याचे ठरवले होते. तुम्हाला गंमत वाटेल, पण लहानपणी मला उडी मारणे आवडायचे आणि म्हणूनच मी हा निर्णय घेतला असावा. गोलरक्षक संघातील महत्त्चाचा खेळाडू असतो.
आयएसएलबाबत काय मत आहे? इतक्या कमी कालावधीत भारतीय खेळाडूंच्या गुणवत्तेत सुधारणा शक्य आहे का?
– आयएसएलबाबत बोलायचे तर फुटबॉलला मोठा प्रेक्षकवर्ग मिळाला आहे. व्यावसायिक दृष्टिकोनातून या लीगची वाटचाल सुरू आहे आणि आंतरराष्ट्रीय खेळाडूंसोबत खेळणे, हे भारतीय खेळाडूंचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी फायद्याचे आहे. त्यामुळे भारतीय फुटबॉलची गुणवत्ताही वाढण्यास मदत होते.
ऑलिम्पिक पात्रता स्पध्रेतील भारताच्या कामगिरीविषयी काय सांगशील?
– आम्ही अपेक्षांची पूर्तता करू शकलो नाही आणि निकालाने भारतीयांना निराश केले; पण संघ संक्रमणाच्या प्रक्रियेतून जात आहे, असे मला वाटते. संघात अनेक युवा खेळाडू आहेत आणि कालानुसार आम्ही कामगिरीत सुधारणा करू, असा मला विश्वास आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Interview with subrato roy

Next Story
ऑलिम्पिक पदकात पुण्याचाही वाटा -सायना
ताज्या बातम्या