विराट कोहली आणि रोहित शर्मा यांसारख्या क्रिकेटपटूंनी लीड्स कसोटीच्या पहिल्या दिवशी जबाबदारी दाखवली नाही. त्यांच्यात जिंकण्याची जिद्दच दिसली नाही, अशी टीका पाकिस्तान संघाचा माजी कर्णधार इंझमाम उह हकने केली आहे. हेडिंग्लेच्या मैदानावर इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात तिसरा कसोटी सामना सुरू आहे. या कसोटी सामन्यातील पहिल्याच दिवशी भारतीय फलंदाज पूर्णपणे फ्लॉप ठरले. भारताचा पहिला डाव ७८ धावांवर संपुष्टात आला. प्रत्युत्तरादाखल इंग्लिश संघाच्या सलामीवीरांनी पहिल्या दिवशी १२० धावा केल्या.

इंझमाम उल हक म्हणाला, “भारतीय फलंदाजांनी इंग्लंडच्या गोलंदाजांवर कोणताही दबाव आणला नाही. २५-३० चेंडू खेळल्यानंतर, तुमचे हात, तुमचे डोळे एकमेकांशी खेळपट्टीशी समन्वय साधू लागतात. त्यानंतर आपण संधीचा फायदा घेऊ शकतो. रोहित शर्माने १०५ चेंडूंचा सामना केला. तुम्ही असे म्हणू शकत नाही की १०५ चेंडू खेळूनही तुम्ही सेट झाला नव्हता. तुम्हाला तुमची जबाबदारी घ्यावी लागेल.”

हेही वाचा – ENG vs IND : ‘‘चेतेश्वर पुजाराचं डोकं फिरलंय आणि तो…’’, दिग्गज क्रिकेटपटूनं केलं वादग्रस्त विधान

“विराट कोहलीनेही ३१ चेंडूंचा सामना केला पण त्यानंतर त्याने काय केले? त्याने सात धावा केल्या आणि तो पूर्णपणे अडकलेला दिसला. तुम्ही काही दिवसांपूर्वी इंग्लंडचा पराभव केला आहे. जर तुम्ही नाणेफेक जिंकली, तर तुम्ही त्यांना फलंदाजी करायला हवी होती. भारत पहिल्या दोन तास खेळपट्टीवरील आर्द्रतेचा फायदा घेऊ शकला असता. भारतीय संघ खेळपट्टीवर असलेल्या ओलाव्याचा फायदा घेऊ शकला असता. मी असे म्हणत नाही, की इंग्लंड संघाचा डाव ७८ धावांवर संपुष्टात आला असता. पण इंग्लंडला देखील मोठी धावसंख्या उभारता आली नसती.”