राजस्थानचा ब्रॉड विजय!

साखळी फेरीत बलाढय़ संघांना धक्के देणाऱ्या राजस्थान रॉयल्सने बुधवारी हैदराबाद सनरायजर्सचा धुव्वा उडवला. शिस्तबद्ध गोलंदाजी आणि ब्रॅड हॉजच्या तुफान फटकेबाजीमुळे राजस्थानने चार बळी राखून ‘एलिमिनेटर’ सामन्याचे शिखर सर केले. आता अंतिम फेरीत मजल मारण्यासाठी होणाऱ्या दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात राजस्थानला मुंबई इंडियन्सचा सामना करावा लागेल.

साखळी फेरीत बलाढय़ संघांना धक्के देणाऱ्या राजस्थान रॉयल्सने बुधवारी हैदराबाद सनरायजर्सचा धुव्वा उडवला. शिस्तबद्ध गोलंदाजी आणि ब्रॅड हॉजच्या तुफान फटकेबाजीमुळे राजस्थानने चार बळी राखून ‘एलिमिनेटर’ सामन्याचे शिखर सर केले. आता अंतिम फेरीत मजल मारण्यासाठी होणाऱ्या दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात राजस्थानला मुंबई इंडियन्सचा सामना करावा लागेल.
सनरायजर्सचे १३३ धावांचे आव्हान पेलताना राजस्थान रॉयल्सने सावध सुरुवात केली. पण त्यांना कर्णधार राहुल द्रविडला (१२) स्वस्तात गमवावे लागले. अजिंक्य रहाणे (१८) आणि शेन वॉटसन (२४) यांनी दुसऱ्या विकेटसाठी ३७ धावा जोडत विजयाच्या दिशेने मार्गक्रमणा केली. मात्र डॅरेन सॅमीने दोन धक्के देत त्यांची १ बाद ४९ अशा स्थितीतून ५ बाद ५७ अशी अवस्था केली. ब्रॅड हॉज आणि संजू सॅमसन यांनी ४५ धावांची भागीदारी रचत राजस्थानच्या विजयाच्या आशा पल्लवित केल्या. अखेरच्या षटकामध्ये १० धावांची आवश्यकता असताना ब्रॅड हॉजने सॅमीला लागोपाठ दोन षटकार ठोकत राजस्थानला चार बळी राखून हा सामना जिंकून दिला. हॉजने २९ चेंडूंत २ चौकार आणि ५ षटकारांसह नाबाद ५४ धावांची खेळी साकारली.
तत्पूर्वी, शिस्तबद्ध गोलंदाजीच्या जोरावर राजस्थानने सनरायजर्सला ७ बाद १३२ धावांवर रोखले होते. राजस्थान रॉयल्सच्या वेगवान माऱ्याचा समर्थपणे सामना करण्यात सनरायजर्सच्या फलंदाजांना अपयश आले.
विक्रमजीत मलिकने लागोपाठच्या षटकांमध्ये पार्थिव पटेल आणि हनुमा विहारी यांना लवकरच माघारी पाठवत सनरायजर्सला २ बाद ३ अशा अडचणीत आणले. पहिल्या सहा षटकांच्या पॉवर-प्लेमध्ये सनरायजर्सना फक्त २७ धावाच करता आल्या. त्यानंतर शिखर धवन (३३) आणि कर्णधार कॅमेरून व्हाईट (३१) यांनी तिसऱ्या विकेटसाठी ५२ धावांची भागीदारी रचून सनरायजर्सच्या डावाला आकार देण्याचा प्रयत्न केला. हे दोघेही पॅव्हेलियनमध्ये परतल्यानंतर डॅरेन सॅमीने तीन षटकारांची आतषबाजी करत सनरायजर्सची धावगती वाढवली. पण चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात सॅमी २९ धावांवर बाद झाल्यानंतर सनरायजर्सच्या फलंदाजांना मोठी खेळी करता आली नाही. राजस्थानकडून मलिकने दोन तर जेम्स फॉल्कनर, सिद्धार्थ त्रिवेदी आणि शेन वॉटसन यांनी प्रत्येकी एक बळी मिळवला.
संक्षिप्त धावफलक
सनरायजर्स हैदराबाद : २० षटकांत ७ बाद १३२ (शिखर धवन ३३, कॅमेरून व्हाईट ३१; विक्रमजीत मलिक २/१४) पराभूत वि. राजस्थान रॉयल्स : १९.२ षटकांत ६ बाद १३५ (ब्रॅड हॉज नाबाद ५४, शेन वॉटसन २४; डॅरेन सॅमी २/२७).

सचिनच्या खेळण्याबाबत संदिग्धता
नवी दिल्ली : दुखापतीमुळे दुसऱ्या ‘क्वालिफायर’ सामन्याला सचिन तेंडुलकर मुकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्याच्या डाव्या मनगटाला दुखापत झाली होती, या दुखापतीतून तो पूर्णपणे सावरला नसल्याने त्याच्या संघसमावेशाबद्दल संदिग्घता वर्तवण्यात येत आहे. कोलकात्याच्या इडन गार्डन्सवर राजस्थान रॉयल्सविरूद्ध हा महत्वपूर्ण सामना होणार असून हा सामना जिंकल्यास मुंबई इंडियन्सचा संघ अंतिम फेरीत पोहोचू शकतो.

ऑरेंज कॅप
१. माइक हसी (चेन्नई सुपर किंग्स)    ७३२
२. ख्रिस गेल (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू)    ७०८
३. विराट कोहली (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू)    ६३४
पर्पल कॅप
१. ड्वेन ब्राव्हो (चेन्नई सुपर किंग्ज)    २८
२. जेम्स फॉल्कनर (राजस्थान रॉयल्स)    २७
३. विनय कुमार (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू)    २३
सर्वाधिक षटकार
१. ख्रिस गेल (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू)    ५१
२. रोहित शर्मा (मुंबई इंडियन्स)    २८
३. किरॉन पोलार्ड (मुंबई इंडियन्स)    २५

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Ipl 013 imperious brad hodge powers rajasthan royals to qualifier