क्रिकेटपटूंना पैसा आणि मुली यांची लालूच दाखवून घडवण्यात आलेल्या ‘स्पॉट फिक्सिंग’ची पाऊले बीसीसीआय आणि आयपीएल फ्रँचायझींच्या दारातूनच बाहेर आल्याचे आता उघड होत आहे. सट्टेबाजीप्रकरणी अटक करण्यात आलेला अभिनेता विंदू दारासिंग हा बीसीसीआयचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांचा जावई व चेन्नई सुपर किंग्जचा सीईओ गुरूनाथ मय्यपन याच्या सातत्याने संपर्कात असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे मय्यपन याचीही चौकशी होण्याची शक्यता आहे.
बीसीसीआयचे अध्यक्ष आणि चेन्नई सुपर किंग या संघाचे अध्यक्ष श्रीनीवासन यांचा जावई गुरुनाथ मयप्पन उर्फ गुरू हा गेल्या सहा वर्षांपासून विंदूचा संपर्कात होता. त्या दोघांचे सतत फोनवर बोलणे व्हायचे. पोलीस विंदूच्या मोबाइल्सचे कॉल डिटेल्स तपासत आहे. गुरुनाथचा सट्टेबाजी प्रकरणाशी संबंध आहे का ते अद्याप स्पष्ट झालेले नाही. गुरूनाथ याला क्रिकेटबद्दल फारशी माहिती नाही, असे विंदूने पोलिसांच्या चौकशीत सांगितले. मात्र, या संपूर्ण प्रकरणाचे धागेदोरे पोलीस तपासत आहेत.

सट्टेबाजांना मदत
विंदू हा सट्टेबाज पवन जयपूर, संजय जयपूर आणि ज्युपीटर या सट्टेबाजांच्या संपर्कात होता. त्यांच्यामार्फत तो क्रिकेट सामन्यांवर सट्टा लावत असे. मुंबई पोलिसांच्या मालमत्ता विभागाने १४ मे रोजी सट्टेबाज रमेश व्यास याला अटक केली होती. पवन जयपूर आणि संजय जयपूर या सट्टेबाज बंधूंना त्याने भारताबाहेर पळून जाण्यात मदत केली. हे दोन सट्टेबाज १६ मे रोजी मुंबईत आले. विंदूने त्यांची उपनगरातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये व्यवस्था केली होती.

फिक्सिंगचा ‘जॅक’
विंदू दारासिंगच्या घराच्या बुधवारी घेतलेल्या झडतीदरम्यान पोलिसांना सट्टेबाज पवन जयपूरचे तीन मोबाइल सापडले. तर विंदूचा लॅपटॉप आणि आयपॅडही पोलिसांनी त्याच्या घरातून जप्त केला आहे. विंदूच्या चौकशीतून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. विंदू सट्टेबारी जगताता ‘जॅक’ नावाने ओळखला जात असे. इतर ‘हाय प्रोफाइल’ मंडळी विंदूमार्फत सट्टा लावत. दिल्लीतील बिल्डर आनंद सक्सेना याच्यामुळे सट्टेबाजीच्या व्यवसायात आलो. आपण सात-आठ वर्षांपासून आयपीएलसह इतर सामन्यांवर सट्टा लावत होतो, अशी कबुली  विंदूने दिली आहे. विंदूचा सट्टेबाजी वर्तुळात मोठा वचक आणि दरारा होता हे स्पष्ट झाले आहे. जे कोणी जॅक उर्फ िवदूकडे सट्टा लावत त्यांच्याकडून विंदूला अर्धा ते एक टक्का कमिशन मिळत होते. विंदूने या मोसमात १७ लाख रुपये मिळाल्याची कबुली दिली आहे.