रायझिंग पुणे सुपरजाएंट्स संघाने मुंबई इंडियन्सचा पराभव करत यंदाची आयपीएल मोहिमेची यशस्वी सुरुवात केली. घरच्या मैदानावर पुण्याने मुंबईला धूळ चारली असली, तरी पुण्याचा यष्टिरक्षक एम. एस. धोनीविरोधात आयपीएल नियमांचा भंग केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. धोनीने केलेला नियमभंग पहिल्या पातळीवरील असल्याचे आयपीएल प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

मुंबई इंडियन्स विरुद्ध गुरुवारी झालेल्या सामन्यात पुण्याची गोलंदाजी सुरु असताना इमरान ताहिरने टाकलेला चेंडू मुंबईचा फलंदाज पोलार्डच्या पायाला लागला. यानंतर ताहिरसह यष्टिरक्षक असलेल्या ताहिरने जोरदार अपील केले. मात्र पंचांनी पुण्याच्या खेळाडूंचे अपील फेटाळून लावले. यानंतर पंचांच्या निर्णयावर नाखूश झालेल्या धोनीने डिआरएसची खूण केली. आयपीएलमध्ये डिआरएसचा वापर केला जात नाही. मात्र पंचांच्या निर्णयाबद्दलची नाराजी दाखवण्यासाठी धोनीने डिआरएसची खूण केली. धोनीच्या या कृत्यामुळे खिलाडूवृत्तीच्या विरोधात असल्याचा ठपका आयपीएलकडून ठेवण्यात आला आहे.

आयपीएल प्रशासनाने डिआरएसची खूण केल्याने यष्टिरक्षक धोनीला दोषी ठरवले असले, तरी व्हिडिओ रिप्लेमध्ये धोनीची चूक नसल्याचे दिसते आहे. ताहिरने टाकलेला चेंडू स्टम्पच्या रेषेच्या थोडासा बाहेर पडला असला तरी तो थेट मधील स्टम्पवर जात असल्याचे रिप्लेमध्ये दिसून आले. त्यामुळे आयपीएलमध्ये जर डिआरएस घेण्याची परवानगी असती, तर पोलार्ड बाद ठरला असता. मात्र आयपीएलमध्ये डिआरएस नसल्याने पोलार्ड सुदैवी ठरला आणि धोनीचे अपील योग्य असूनही त्याला दोषी ठरवण्यात आले.