मुंबई इंडियन्सचा गोलंदाज आणि ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू मिचेल जॉन्सनने भारतीय गोलंदाजांचे तोंडभरुन कौतुक केले. गेल्या दोन ते तीन वर्षात भारतीय गोलंदाजांच्या शरीरयष्टीत कमालीची सुधारणा झाल्याचे मिचेल जॉन्सन म्हणाला. मिचेल जॉन्सनने एका कार्यक्रमात त्याच्या करिअरमधील खाचखळगे, गोलंदाजीत केलेल्या सुधारणा याबाबतची माहिती दिली. गोलंदाजीत नावीण्य आणण्यासाठी केलेले कष्ट, सरावावेळी तासंतास गाळलेला घाम अशा सर्व गोष्टींवर त्याने प्रकाशझोत टाकला.
”गोलंदाजीत सुधारणा आणि विविधता आणण्यासाठी मी अनेक प्रयोग केले. तीनशेहून अधिक व्हिडिओ माझ्याकडे होत्या. त्याचा अभ्यास करून माझ्या गोलंदाजीत बदल करत राहिलो. स्लोअर वन कसे टाकायचे, बाऊन्सरसाठी काय करावे लागते, चेंडूला स्विंग कसा आणावा या सगळ्या गोष्टींचा मी बारकाईने अभ्यास केला. जास्तीत जास्त सराव केला.”, असे जॉन्सनने सांगितले.
भारतीय गोलंदाजांमधील बदलावरही त्याने आवर्जुन भाष्य केले. ”क्रिकेट विश्वात गेल्या दोन-तीन वर्षात भारतीय गोलंदाजांच्या शरीरयष्टीत कमालीचा बदल झाल्याचे मला दिसून आले. अचूक वेग आणि टप्प्यातील गोलंदाजीसाठी गोलंदाजाची शरीरयष्टी खूप महत्त्वाची असते. भारतीय गोलंदाजांमध्ये दिसणाऱ्या सुधारणांमुळे मी भारावलो आहे. भारतीय गोलंदाजी खरंच वाखाणण्याजोगी आहे. भारतीय गोलंदाज योग्य योष्टी अंमलात आणत असल्यानेच त्यांच्यात हा बदल झाला आहे.”, असे जॉन्सन म्हणाला.
ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू मॅथ्यू हेडनमुळे आपल्या गोलंदाजीत सुधारणा झाल्याचेही जॉन्सनने सांगितले. नेटमध्ये हेडन माझ्या प्रत्येक चेंडूचा समाचार घ्यायचा. त्याची फलंदाजी फोडून काढण्याचे आव्हान माझ्यासमोर असायचे. हेडन विकेट कशी घ्यायची, कुठे टप्पा टाकायचा याचा विचार करून मी अधिक प्रगत होत गेलो. हेडनच्या फटकेबाजीमुळेच माझ्या गोलंदाजीत सुधारणा होत गेली. आपण नेहमी कुठेतरी कमी पडतोय असं वाटायचं आणि मी पुन्हा जोमाना प्रयत्नाला लागायचो. हेडन नेटमध्ये असला तरी त्याला बाद करण्याचे आव्हान समोर असायचे आणि यातूनच माझ्या गोलंदाजीला अधिकाअधिक बहर येत गेला, असे जॉन्सनने सांगितले.