कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या इतिहासात अनोख्या विक्रमाची नोंद केली आहे. रविवारी हैदराबादच्या मैदानावर झालेल्या सामन्यात, मुंबईने चेन्नईवर एका धावाने मात करत विजेतेपद पटकावलं. याआधी २०१७ साली झालेल्या अंतिम फेरीतही मुंबईने पुण्यावर एका धावेने मात केली होती. रोहित शर्माचं कर्णधार म्हणून हे चौथं विजेतेपद ठरलं. या कामगिरीसह रोहित शर्माचं आयपीएल विजेतेपदांशी असणारं एक आगळंवेगळं समीकरण समोर आलं आहे.

कारकिर्दीच्या सुरुवातीला डेक्कन चार्जर्स आणि त्यानंतर मुंबई इंडियन्सचं प्रतिनीधीत्व करणाऱ्या रोहित शर्माने नेहमी सर्वांना आपली दखल घेण्यास भाग पाडली आहे. यंदाच्या हंगामात रोहितला आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही, मात्र तरीही संघाचं नेतृत्व खडतर प्रसंगात कसं केलं जातं हे देखील रोहित शर्माने दाखवून दिली आहे.

दरम्यान, १५० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सलामीवीर फाफ डु प्लेसिस याने तुफान फटकेबाजीला सुरुवात केली. पण त्यातच तो यष्टिचीत झाला. षटकात २ चौकार आणि १ षटकार लगावल्यानंतरही त्याने आणखी एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी काहीही कळण्याआधीच क्विंटन डी कॉक ने त्याला यष्टीचीत करत चेन्नईला पहिला धक्का दिला. डु प्लेसिसने २६ धावा केल्या. संथ खेळी करत खेळपट्टीवर स्थिरावण्याचा प्रयत्न करताना रैना झेलबाद झाला. त्याने १४ चेंडूत ८ धावा केल्या. आखूड टप्प्याच्या चेंडूवर मोठा फटका खेळताना रायडू स्वस्तात झेलबाद झाला. त्याने केवळ १ धाव काढली. पहिली धाव पूर्ण केल्यानंतर खराब क्षेत्ररक्षणामुळे कर्णधार धोनीने दुसरी धाव घेण्याचा विचार केला, पण ईशान किशनने उत्तम थ्रो करत त्याला धावचीत केले. धोनीने ८ चेंडूत २ धावा केल्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एका बाजूने गडी बाद असताना शेन वॉटसनचे मात्र संयमी खेळी करत झुंजार अर्धशतक ठोकले. अर्धशतकानंतर त्याने तुफान फटकेबाजी केली पण दुहेरी धाव घेताना तो ८० धावांवर धावचीत झाला. नंतर सामना अत्यंत अटीतटीचा झाला. शेवटच्या चेंडूवर २ धावा हव्या असताना मलिंगाने फलंदाजाला पायचीत करत मुंबईला विजय मिळवून दिला.