आयपीएलच्या बाराव्या हंगामात, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची सुरुवात अतिशय खराब झाली. पहिल्या चारही सामन्यांमध्ये बंगळुरुला पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यांमध्ये विराट कोहली आणि एबी डिव्हीलियर्सवर इतर खेळाडूंचं अवलंबून असणं, संघाला चांगलंच भोवलं. मात्र कोलकात्याविरुद्ध घरच्या मैदानावर खेळत असताना विराट कोहलीने आपला फॉर्म परत मिळवत, दिग्गज खेळाडूंच्या पंक्तीत स्थान मिळवलं आहे.

अवश्य वाचा – IPL 2019 : पंजाबविरुद्धच्या सामन्यात ब्राव्होच्या समावेशावर प्रश्नचिन्ह

टी-20 क्रिकेटमध्ये विराट कोहलीने 8 हजार धावांचा टप्पा ओलांडला. टी-20 क्रिकेटच्या इतिहासात सर्वात जलद 8 हजार धावांचा टप्पा ओलांडणारा विराट दुसरा फलंदाज ठरला आहे. विराटने 243 डावांमध्ये ही कामगिरी करुन दाखवली, ख्रिस गेलने 213 डावांमध्ये ही कामगिरी केली आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हा संघ सध्या IPL मधील सर्वात अयशस्वी संघ ठरला आहे. त्यांनी खेळलेल्या ४ सामन्यांपैकी चारही सामने ते पराभूत झाले आहेत. विशेष म्हणजे यातील दोन सामन्यात RCB ला मानहानीकारक पराभवाला सामोरे जावे लागले होते. धोनीच्या चेन्नईने त्याला १०० च्या आत गुंडाळले होते, तर हैदराबादच्या संघाने त्यांना तब्बल ११८ धावांनी धूळ चारली होती. या पराभवांना RCB च्या व्यवस्थापनाचा कर्णधार कोहली आणि एबी डीव्हिलियर्स यांच्यावरील अतिविश्वास जबाबदार आहे, असे मत माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे आगामी सामन्यात विराट कोहली आणि बंगळुरुचा संघ कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

अवश्य वाचा – IPL 2019 : हैदराबादसाठी मोहम्मद नबी ठरतोय शंभर नंबरी सोनं

इतर कोणत्याही संघाप्रमाणे समतोल संघ खेळवून सामना जिंकावा, असा प्रयत्न बंगळुरूचे व्यवस्थापन करत आहे. पण त्यांना त्यात सातत्याने अपयश आले आहे. बंगळुरूचा संघ सलामीच्या जोडीत आणि वरच्या फळीत कायम बदल करत आहे. मधल्या फळीनेही त्यांना समाधानकारक धावसंख्या मिळवून देण्यात मदत केलेली नाही. त्याचा परिणाम म्हणजे विराट कोहली आणि एबी डीव्हिलियर्स यांचा समावेश असलेला संघ इतरांपेक्षा फार कमी धावसंख्या करण्यात पात्र ठरत आहे, असे गावसकर यांनी स्पष्ट केले.