IPL 2019 SRH vs CSK Updates : डेव्हिड वॉर्नर (५०) आणि जॉनी बेअरस्टो (६१*) यांच्या दमदार अर्धशतकांच्या जोरावर हैदराबादने चेन्नईवर ६ गडी राखून मात केली. फिरकीपटू रशीद खानची प्रभावी फिरकी आणि त्याला गोलंदाजांची मिळलेली उत्तम साथ याच्या बळावर हैदराबादने चेन्नईला २० षटकात ५ बाद १३२ धावांत रोखले आणि हैदराबादला १३३ धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान हैदराबादने १९ चेंडू राखून पूर्ण केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या सामन्यात टेनिसस्टार सानिया मिर्झा हिची विशेष उपस्थिती दिसून आली. पुलवामा हल्ल्यानंतर सानिया मिर्झा तिच्या ट्विटर मेसेजवरून प्रचंड ट्रोल झाली होती. त्या घटनेनंतर प्रथमच सानिया मिर्झा IPL मध्ये दिसून आली. महत्वाचे म्हणजे सानियाची मिर्झा हिच्या उपस्थितीमध्ये हैदराबादने गुणतालिकेत अव्वल असणाऱ्या चेन्नईला पराभूत केले.

दरम्यान, १३३ धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना डेव्हिड वॉर्नरने दमदार सुरुवात केली आणि हैदराबादला अर्धशतकी सलामी दिली. पण अर्धशतक पूर्ण केल्यावर वॉर्नर बाद झाला आणि हैदराबादला पहिला धक्का बसला. हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसन ताहिरच्या फिरकीवर झेलबाद झाला आणि हैदराबादला दुसरा धक्का बसला. त्याने केवळ ३ धावा केल्या. अष्टपैलू खेळाडू विजय शंकर स्वस्तात झेलबाद झाला आणि हैदराबादला तिसरा धक्का बसला. तो केवळ ७ धावांवर माघारी परतला. सलामीवीर जॉनी बेअरस्टोने मात्र संयमी खेळी करत ३९ चेंडूत अर्धशतक ठोकले, तो ६१ धावांवर नाबाद राहिला.

त्याआधी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेणाऱ्या चेन्नईने डावाला धडाकेबाज सुरुवात केली. सलामीवीर वॉटसन आणि डु प्लेसिस यांनी चेन्नईला सातव्या षटकात अर्धशतकी सलामी मिळवून दिली. पण चांगली सुरुवात मिळाल्यानंतर चेन्नईचा सलामीवीर वॉटसन त्रिफळाचीत झाला. ४ चौकारांसह ३१ धावा करून तो माघारी परतला. अर्धशतकाच्या जवळ पोहोचलेला डु प्लेसिसदेखील उसळत्या चेंडूवर झेलबाद झाला. त्याने ३१ चेंडूत ३ चौकार आणि ३ षटकार खेचत ४५ धावा केल्या.

त्यानंतर धोनीच्या अनुपस्थितीमध्ये कर्णधारपद भुषवणारा सुरेश रैना मैदानावर आला. तो खेळपट्टीवर जम बसवणार इतक्याच तो पायचीत झाला. त्याने १३ चेंडूत १३ धावा केल्या. पाठोपाठ केदार जाधवदेखील पायचीत झाला. त्याला केवळ १ धाव जमवता आली. विशेष म्हणजे या दोनही विकेटच्या वेळी मैदानावरील पंचांनी फलंदाजाला बाद ठरवले. त्यामुळे CSK ने DRS ची मदत घेतली, पण दोनही वेळा रिव्ह्यूमध्ये त्यांना मैदानावरील पंचांचा निर्णय मान्य करावा लागला. त्यानंतर परदेशी खेळाडू म्हणून संघात समावेश करण्यात आलेला सॅम बिलिंग्स आपली छाप उमटवू शकला नाही. तो भोपळाही न फोडता माघारी परतला. अखेर अंबाती रायडू आणि रवींद्र जाडेजा यांच्यामुळे चेन्नईला १३२ धावांपर्यंत मजल मारता आली.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2019 sania mirza present in stadium at match between srh and csk
First published on: 18-04-2019 at 00:00 IST