आयपीएलच्या बाराव्या हंगामात बंगळुरु रॉयल चॅलेंजर्सवर मात करुन दिल्लीने प्ले-ऑफ (बाद फेरी) मध्ये दाखल होण्याचा बहुमान मिळवला आहे. घरच्या मैदानावर दिल्लीने बंगळुरुवर १६ धावांनी मात केली. दिल्लीने विजयासाठी दिलेलं १८८ धावांचं आव्हान बंगळुरुचा संघ पूर्ण करु शकला नाही. या विजयासह दिल्लीची तब्बल ७ वर्षांची प्रतिक्षा फळाला आली आहे. २०१२ साली दिल्लीचा संघ शेवटचा प्ले-ऑफसाठी पात्र ठरला होता.

गेल्या काही हंगामांमध्ये दिल्लीच्या संघाची कामगिरी चांगली झाली नव्हती. मात्र बाराव्या हंगामात दिल्लीच्या व्यवस्थापनात झालेले बदल, खेळाडूंची योग्य निवड आणि प्रशिक्षकांची साथ या जोरावर दिल्लीने यंदा ही किमया साधली आहे.
दुसरीकडे बंगळुरुच्या खराब कामगिरीचा सिलसिला या हंगामातही तसाच सुरु आहे. गुणतालिकेत तळाशी असलेल्या बंगळुरुने रविवारच्या सामन्यात आपल्या शंभराव्या पराभवाची नोंद केली आहे. टी-२० क्रिकेटमध्ये १०० पराभव झेलणारा बंगळुरु तिसरा संघ ठरला आहे.

विराट कोहली-पार्थिव पटेल जोडीने आक्रमक सुरुवात करत पहिल्या विकेटसाठी ६३ धावांची अर्धशतकी भागीदारी केली. या दोन्ही फलंदाजांनी झटपट धावा जमवत दिल्लीवर दबाव आणला, मात्र रबाडाने पटेलला माघारी धाडलं. यानंतर ठराविक अंतराने विराट कोहली, एबी डिव्हीलियर्स, शिवम दुबे, हेन्रिच क्लासेन हे फलंदाज माघारी परतत राहिले. अखेरच्या षटकात गुरकिरत मान आणि मार्कस स्टॉयनीस जोडीने संघाला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे, मात्र त्यांचे प्रयत्न अपुरेच पडले. दिल्लीकडून अमित मिश्रा आणि कगिसो रबाडाने २ तर इशांत शर्मा, अक्षर पटेल, शेरफन रुदरफोर्ड यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला.