आयपीएलचा तेरावा हंगाम आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. २९ मार्चपासून या वर्षाच्या हंगामाला सुरुवात होणार असून, गतविजेते मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात पहिला सामना रंगणार आहे. या सामन्यासाठी चेन्नईच्या खेळाडूंनी दणक्यात सरावाला सुरुवात केली आहे. संघाचा कर्णधार आणि महत्वपूर्ण खेळाडू महेंद्रसिंह धोनीनेही प्रदीर्घ कालावधीनंतर आज सरावासाठी मैदानात पाऊल ठेवलं. धोनीला सराव करताना पाहण्यासाठी मैदानात अनेक चाहत्यांची गर्दी जमली होती. ज्या क्षणी धोनी सरावासाठी आला त्या क्षणालाच चाहत्यांनी एकच जल्लोष केला. चेन्नई सुपरकिंग्जने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

२०१९ विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचं आव्हान संपुष्टात आल्यानंतर धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासू लांब राहिलेला आहे. निवड समितीने धोनीला विश्रांती देत ऋषभ पंतला संधी दिली. मात्र ऋषभ पंतला आपल्याला मिळालेल्या संधीचं सोनं करता आलेलं नाहीये. फलंदाजी आणि यष्टींमागची त्याची ढिसाळ कामगिरी अजुनही सुरुच आहे. एकीकडे धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून कधी निवृत्ती स्विकारणार याच्या चर्चा सुरु असताना, त्याच्या चाहत्यांना तो भारतीय संघात पुनरागमन करेल अशीही आशा आहे. मध्यंतरी भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी धोनी आयपीएलमध्ये कसा खेळतो, यावर त्याचं भारतीय संघातलं पुनरागमन अवलंबून असेलं असं वक्तव्य केलं होतं. त्यामुळे आगामी आयपीएल हंगामात धोनीच्या कामगिरीकडे सर्वांचं लक्ष असेल.