आयपीएलचा तेरावा हंगाम युएईमध्ये खेळवला जाणार आहे. आयपीएल गव्हर्निंग काउन्सिलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी ESPNCricinfo शी बोलत असताना याबद्दल माहिती दिली. गव्हर्निंग काऊन्सिलच्या आगामी बैठकीत याबद्दल अधिकृत घोषणा करण्यात येईल असं पटेल म्हणाले. स्पर्धेच्या तारखांबद्दल अद्याप पटेल यांनी कोणतीही माहिती दिली नसली तरीही याआधी प्रसारमाध्यमांत आलेल्या वृत्तानुसार २६ सप्टेंबर ते ७ नोव्हेंबर या काळात बीसीसीआय तेराव्या हंगामाचं आयोजन करण्याच्या तयारीत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“आयसीसी टी-२० विश्वचषकाचं आयोजन पुढे ढकललं जाईल याची वाट आम्ही पाहत होतो. आयसीसीने याबद्दलची घोषणा केल्यानंतर आम्ही भारत सरकारकडे परवानगी मागितली आहे. आम्हाला परवानगी मिळेल अशी आशा आहे”, पटेल यांनी माहिती दिली. दुबई, अबुधाबी आणि शारजाह या तीन मैदानांवर ही स्पर्धा खेळवली जाईल. या स्पर्धेला चाहत्यांना परवानगी असेल की नाही याबद्दल विचारलं असता तो निर्णय UAE मधील सरकारचा असल्याचं पटेल यांनी सांगितलं. आयपीएल स्पर्धा आटोपल्यानंतर भारतीय खेळाडू तिकडून ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहेत. त्यांना पुढील दौऱ्यासाठी पुरेसा वेळ मिळावा व इतर आवश्यक नियमांचं पालन व्हावं यासाठी ७ नोव्हेंबरला स्पर्धेचा अंतिम सामना खेळवण्यात येणार असल्याचं कळतंय.

सोमवारी संध्याकाळी आयसीसीने टी-२० विश्वचषकाचं आयोजन पुढे ढकलल्याची अधिकृत घोषणा केली. ठरलेल्या वेळापत्रकानुसार २९ मार्चपासून आयपीएलच्या तेराव्या हंगामाचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र देशातली करोनाची परिस्थिती लक्षात घेता बीसीसीआयने ही स्पर्धा १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलली. यानंतरही परिस्थिती नियंत्रणात न आल्यामुळे अखेरीस ही स्पर्धा पुढील सूचना मिळेपर्यंत स्थगित करण्यात आली. पण स्पर्धा रद्द झाल्यास बीसीसीआयला ४ हजार कोटींचं नुकसान होणार होतं. ते टाळण्यासाठी वर्षाअखेरीस स्पर्धेचं आयोजन करता यावं यासाठी बीसीसीआय मोर्चेबांधणी करत होतं. आशिया चषकानंतर टी-२० विश्वचषकाचं आयोजनही पुढे ढकलल्यानंतर बीसीसीआयसाठी आयपीएलच्या तेराव्या हंगामाचं आयोजन करण्यासाठीचा रस्ता मोकळा झाला. याआधीही २०१४ साली आयपीएलचे काही सामने युएईमध्ये भरवण्यात आले होते.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2020 to be held in the uae confirms ipl governing council president brijesh patel psd
First published on: 21-07-2020 at 20:53 IST