आज (10 एप्रिल, शनिवार) आयपीएल 2021च्या दुसर्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स आमनेसामने असणार आहे. एकीकडे आयपीएलचा सर्वात अनुभवी कर्णधार महेंद्रसिंह धोनी चेन्नईचे नेतृत्व करेल. तर, दुसरीकडे आयपीएलमध्ये प्रथमच कर्णधारपद मिळालेला ऋषभ पंत दिल्ली कॅपिटल्सला विजयी सुरुवात मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असेल. मुंबईच्या वानखेडेवर ही लढत होणार असून खेळपट्टी कोणाला साथ देईल, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
मुंबईचे वानखेडे स्टेडियम हे भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी नेहमीच खास राहिले आहे. 2011मध्ये भारताने या मैदानातच आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप जिंकला होता. त्यामुळे धोनीला ही खेळपट्टी जास्त परिचित असेल. मात्र, यंदाच्या आयपीएलमध्ये कोणताही संघ त्यांच्या घरच्या मैदानावर खेळत नसल्यामुळे प्रत्येक संघाला तटस्थ जागेचे आव्हान पेलावे लागेल.
कशी असेल वानखेडेची खेळपट्टी
मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवरील खेळपट्टी फलंदाजांसाठी नेहमीच फायद्याचा मानली गेली आहे. त्यामुळे ऋषभ पंत, पृथ्वी शॉ, शिखर धवन, फाफ डु प्लेसिस हे फलंदाज येथे चांगल्या धावा करू शकतात. तर, मधल्या फळीत धोनीसारख्या मोठ्या हिटर्सला या खेळपट्टीचा फायदा होऊ शकतो. वेगवान गोलंदाजांचे येथे वर्चस्व असले, तरी दोन्ही संघांना आपल्या सर्वोत्कृष्ट फिरकी गोलंदाजांसह मैदानात उतरण्याची इच्छा असेल.
या मैदानावरील सर्वात मोठी धावसंख्या उभारणाऱ्या संघामध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे नाव प्रथम स्थानी आहे. 2015च्या हंगामात त्यांनी मुंबई इंडियन्सविरुद्ध 235 धावा उभारल्या होत्या. दुसरीकडे, नीचांकी धावसंख्येच्या बाबतीत कोलकाता नाइट रायडर्सने 2008मध्ये या मैदानावर 67 धावांचा लाजिररवाणा विक्रम नोंदवला आहे.
संभाव्य प्लेईंग XI
दिल्ली कॅपिटल्स
पृथ्वी शॉ, शिखर धवन, अजिंक्य रहाणे, शिमरॉन हेटमायर, ऋषभ पंत (कर्णधार), मार्कस स्टोइनिस, आर. अश्विन, अमित मिश्रा, ख्रिस वोक्स, ईशांत शर्मा, स्टीव्ह स्मिथ.
चेन्नई सुपर किंग्ज
फाफ डु प्लेसिस, रॉबिन उथप्पा, अंबाटी रायुडू, सुरेश रैना, सॅम करन, महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), रवींद्र जडेजा, मोईन अली, शार्दुल ठाकूर, दीपक चहर, इम्रान ताहीर.