करोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून निर्माण केलेल्या बायो-बबलमध्येही करोनाचा शिरकाव केल्यामुळे चार महिन्यांच्या अंतराने दोन टप्प्यांत खेळवाव्या लागलेल्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटच्या १४ व्या हंगामाचे जेतेपदाचे सोने शुक्रवारी कोण लुटणार, ही उत्कंठा आता शिगेला पोहोचली आहे. दडपणाखालीसुद्धा डोके शांत ठेवत रणनीती आखणारा कुशल संघनायक आणि कठीण समय येता बॅटच्या तडाख्याने सामन्याचे चित्र पालटणारा फलंदाज महेंद्रसिंह धोनी चेन्नईला पुन्हा एकदा जेतेपद मिळवून देणार का हे लवकरच स्पष्ट होईल. अनुभवी खेळाडूंचा भरणा असलेल्या चेन्नई सुपर किंग्जला चौथ्या विजेतेपदापासून रोखण्याचे कडवे आव्हान फिरकी त्रिकुटासह खेळणाऱ्या ईऑन मॉर्गनच्या नेतृत्वाखाली कोलकाता नाइट रायडर्सपुढे असणार आहे. या दोन्ही संघाच्या जय पराजयाच्या आकडेवारी आधी कोणत्या खेळाडूंच्या कामगिरीकडे विशेष लक्ष असणार आहे पाहूयात…

कोलकात्याच्या फलंदाजांना रोखण्याचं धोनीसेनेपुढे आव्हान
सातत्याने फलंदाजी करणारा शुभमन गिल (एकूण ४२७ धावा), दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध विजयी षटकार खेचणारा राहुल त्रिपाठी (३९५) आणि नितीश राणा (३८३) यांच्यावर कोलकाताच्या फलंदाजीची मदार आहे. परंतु अमिरातीच्या दुसऱ्या टप्प्यात कामगिरी उंचावणारा वेंकटेश अय्यरला (३२० धावा) रोखण्याचे आव्हान चेन्नईच्या गोलंदाजांपुढे असेल. याशिवाय मॉर्गन, दिनेश कार्तिक, शाकिब अल हसन, सुनील नरिन यांच्यासारखे भरवशाचे फलंदाज कोलकाताकडे आहेत.

IPL 2024 Mumbai Indians vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
IPL 2024: षटकारांच्या हॅटट्रिकनंतर धोनीने पुन्हा जिंकली मनं, हार्दिकची धुलाई केलेला चेंडू चाहतीला दिला भेट
IPL 2024 RR vs PBKS Match Updates in marathi
PBKS vs RR : युजवेंद्र चहलला इतिहास रचण्याची सुवर्णसंधी! IPL मध्ये ‘ही’ कामगिरी करणारा ठरणार पहिलाच गोलंदाज
Gautam Gambhir Hugs MS Dhoni after CSK vs KKR Match IPL 2024
IPL 2024: चेन्नई-कोलकाताच्या सामन्यापेक्षा धोनी-गंभीरच्या गळाभेटीची चर्चा, दोघांच्या ‘जादू की झप्पी’ चा VIDEO व्हायरल
suryakumar yadav
सूर्यकुमार यादव तंदुरुस्त; दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्सच्या सरावात सहभागी

चेन्नईचा संघही फलंदाजीला दमदार…
धोनीच्या मार्गदर्शनाखाली गेली दोन वर्षे विकसित झालेल्या पुण्याच्या ऋतुराज गायकवाडवर (एकूण ६०३ धावा) चेन्नईच्या फलंदाजीची प्रमुख भिस्त आहे. यंदाच्या हंगामात त्याने एक शतक आणि चार अर्धशतके झळकावली आहेत. ३७ वर्षीय फॅफ डय़ू प्लेसिसच्या (५४७ धावा) साथीने तो चेन्नईला सातत्याने उत्तम सलामी नोंदवून देत आहे. याशिवाय मोईन अली, अंबाती रायुडू, रवींद्र जडेजा, धोनी हे अनुभवी फलंदाज गरजेनुसार संघाला उपयुक्त योगदान देत आहेत.

कोलकात्याची फिरकी चेन्नईला गुंडाळणार?
कोलकाताच्या गोलंदाजीचे यश वरुण चक्रवर्ती (एकूण १८ बळी), नरिन (१४ बळी) आणि शाकिब (४ बळी) या फिरकी त्रिकुटामुळे मिळवले आहे. याशिवाय लॉकी फग्र्युसन (१३ बळी), प्रसिध कृष्णा (१२ बळी), शिवम मावी यांच्यासारखे वेगवान गोलंदाज कोलकाताकडे आहेत.

चेन्नईकडे फिरकी आणि वेगवान गोलंदाजही
भारतीय संघात स्थान मिळवणारा वेगवान गोलंदाज शार्दूल ठाकूर (एकूण १८ बळी), ड्वेन ब्राव्हो (१३ बळी), दीपक चहर (१३ बळी), जोश हेझलवूड आणि लुंगी एन्गिडी यांच्यासारखे तेज गोलंदाज चेन्नईकडे आहेत. याशिवाय जडेजा, मोईन, इम्रान ताहीर यांच्यासारखे हुकमी फिरकी गोलंदाजही आहेत.

आकडेवारीबद्दल बोलायचं झाल्यास एकच गोष्ट चेन्नईच्या चिंतेत भर टाकणारी आहे. ती कोणती ते आपण पाहूयात…

एकूण आयपीएलमधील आकडेवारी काय सांगते?
कोलकाता आणि चेन्नईचे संघ आयपीएलच्या सर्व १४ पर्वांमध्ये एकूण २६ वेळा आमने-सामने आलेत त्यापैकी १७ वेळा धोनीची चेन्नईच सुपर किंग्स ठरलीय. तर कोलकात्याला केवळ नऊ वेळा विजय मिळवता आलाय. दुबईमधील आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावर या संघांमध्ये केवळ एक सामना झाला असून तो सुद्धा चेन्नईनेच जिंकलाय. मागील पाच सामन्यांपैकी चार सामन्यांमध्ये चेन्नईने विजय मिळवला आहे. तर आयपीएलच्या यंदाच्या पर्वात म्हणजेच २०२१ मध्ये दोनवेळा हे संघ एकमेकांसमोर आले तेव्हा सुद्धा चेन्नईनेच सामना जिंकल्याने चेन्नईचे पारडे जड असल्याचं दिसत आहे.

फंलदाजी की गोलंदाजी?
दोन्ही संघ आमने-सामने आलेल्या २६ सामन्यांमध्ये प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने सहा वेळा सामना जिंकलाय तर कोलकात्याला हे केवळ एकदाच शक्य झालंय. या उलट दुसऱ्यांदा फलंदाजी करताना म्हणजेच धावांचा पाठलाग करताना चेन्नईविरोधात कोलकात्याची कामगिरी समाधानकारक आहे. मात्र इथेही चेन्नई त्यांच्या वरचढच आहे. दुसऱ्यांदा फलंदाजी करुन चेन्नईने ११ वेळा कोलकात्याला पराभूत केलंय तर कोलकात्याने हा पराक्रम केवळ आठ वेळा केलाय.

जेतेपदांमध्ये चेन्नई आघाडीवर, पण…
चेन्नईने २०१०,२०११ आणि २०१८ मध्ये जेतेपद जिंकले आहे. तर २००८, २०१०, २०११, २०१२, २०१३, २०१५, २०१८, २०१९ आणि २०२१ अंतिम फेरी गाठलीय. कोलकात्याच्या संघाने २०१२ आणि २०१४ मध्ये जेतेदपावर नाव कोरलं आहे. २०१२ मध्ये त्यांनी अंतिम सामन्यात चेन्नईला पराभूत केलं होतं. हा कोलकात्याचा तिसरा अंतिम सामना ठरणार आहे.

चेन्नईसाठी चिंतेची बाब म्हणजे…
आकडेवारीची तुलना केल्यास ‘आयपीएल’मध्ये नऊ वेळा (दोन वर्षे निलंबित) अंतिम फेरी गाठणाऱ्या चेन्नईचे पारडे जड आहे. परंतु नऊपैकी फक्त तीनदा त्यांना जेतेपदात रूपांतर करता आले आहे. परंतु कोलकाताने अंतिम फेरी गाठल्यावर दोन्ही वेळा विजेतेपद निश्चितपणे जिंकले आहे. हीच गोष्ट चेन्नईची चिंता वाढवणारी आहे. बाकी आकडेवारीनुसार चेन्नईच सुपर किंग्स असली तरी अंतिम फेरीमध्ये कोलकात्याने अगदी चेन्नईलाही धूळ चारल्याचं २०१२ मध्ये दिसून आलं आहे. त्यामुळे आता चेन्नई हा इतिहास बदलणार की कोलकाता तिसऱ्यांदा जेतेपदावर नाव कोरणार हे आज स्पष्ट होईल. मात्र अंतिम सामन्यात कोलकात्याने पराभूत केल्याचं थोडंफार दडपण धोनी आणि त्याच्या टीमवर असणार हे नक्की.

खेळपट्टीचा अहवाल:
दुबईची खेळपट्टी फलंदाजांसाठी अनुकूल मानली जाते. परंतु सामना पुढे जातो, तशी ती धिमी होत जाते. त्यामुळे १७० ही धावसंख्या होण्याची शक्यता आहे. सध्याच्या ‘आयपीएल’मधील ११ पैकी ९ सामने हे लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघाने जिंकले आहेत.

कोलकात्याचा संघ :
ईऑन मॉर्गन (कर्णधार), दिनेश कार्तिक, गुरकिराट सिंग मान, करुण नायर, नितीश राणा, राहुल त्रिपाठी, शुभमन गिल, हरभजन सिंग, कमलेश नागरकोटी, लॉकी फग्र्युसन, पवन नेगी, एम प्रसिध कृष्णा, संदीप वॉरियर, शिवम मावी, टीम साऊदी, वैभव अरोरा, वरुण चक्रवर्ती, आंद्रे रसेल, बेन कटिंग, शाकिब अल हसन, सुनील नारायण, वेंकटेश अय्यर, शेल्डन जॅक्सन, टिम सेफर्ट.

चेन्नईचा संघ :
महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), सुरेश रैना, अंबाती रायडू, के. एम. आसिफ, दीपक चहर, ड्वेन ब्राव्हो, फॅफ डय़ू प्लेसिस, इम्रान ताहिर, एन. जगदीशन, कर्ण शर्मा, लुंगी एन्गिडी, मिशेल सँटनर, रवींद्र जडेजा, ऋतुराज गायकवाड, शार्दूल ठाकूर, आर. साई किशोर, मोईन अली, के. गौतम, चेतेश्वर पुजारा, हरिशंकर रेड्डी, भगत वर्मा, सी. हरी निशांत.