आयपीएल २०२१च्या दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सने दिल्ली कॅपिटल्सचा ३ गडी राखून पराभव करत स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. आयपीएल २०२१चा अंतिम सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात १५ ऑक्टोबरला रंगणार आहे. त्यामुळे या दोघांमध्ये कोण जिंकणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमीवर दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज डेल स्टेनने मोठा अंदाज वर्तवला आहे. त्याने म्हटले आहे की चेन्नई सुपर किंग्ज (CSK) चा संघ अंतिम सामना जिंकेल. डेल स्टेनच्या मते, केकेआर ज्या प्रकारे वाईट निर्णय घेतो आणि वरिष्ठ खेळाडूंचा खराब फॉर्ममुळे त्यांना अंतिम सामन्यात फटका बसू शकतो.

डेल स्टेन ईएसपीएन क्रिकइन्फोला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला, “मी नेहमीच आकडेवारी बघत असतो. हा सामना कॅसिनोसारखा असणार आहे. जर सलग १० वेळा काळा आला असेल, तर कधीतरी नक्कीच लाल असेल.मला असे वाटते की केकेआरला नक्कीच वाईट दिवस येतील. त्यांचे चुकीचे निर्णय आणि इऑन मॉर्गन आणि दिनेश कार्तिक यांचा खराब फॉर्मचा त्यांना फटका सहन करावा लागू शकतो.”

स्टेन पुढे म्हणाला, “सीएसके खूप चांगली टीम आहे. ते योग्य वेळी योग्य दिशेने गेले आहेत. धोनीने दिल्लीविरुद्ध चांगली फलंदाजी केली आणि त्याचे कर्णधारपदही उत्कृष्ट राहिले. त्यांचे फलंदाज फॉर्मात आहेत. मला असे वाटते की केकेआर कदाचित हा सामना हारेल.”

DC vs KKR : कोलकातानं ‘दिल्ली’ जिंकली; आता अंतिम लढत चेन्नईशी!

शारजामध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने दिल्ली कॅपिटल्सचा तीन गडी राखून पराभव केला. यासह कोलकाता अंतिम फेरीत दाखल झाला. प्रथम खेळताना दिल्ली कॅपिटल्सने निर्धारित २० षटकांत पाच गडी गमावून १३५ धावा केल्या आणि प्रत्युत्तरात कोलकाताने २० व्या षटकात सात गडी गमावून लक्ष्य गाठले. केकेआरला शेवटच्या दोन चेंडूंवर विजयासाठी सहा धावांची गरज होती आणि राहुल त्रिपाठीने अश्विनला शानदार षटकार ठोकून आपल्या संघाला अंतिम फेरीत नेले.