महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जने पहिल्या लढतीत पराभव पत्करल्यानंतर सलग दोन सामने जिंकून इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये विजयी लय मिळवली. त्यामुळे बुधवारी होणाऱ्या सायंकाळच्या लढतीत संघाची योग्य निवड करण्यासाठी अद्यापही झुंजणाऱ्या कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध चेन्नईचेच पारडे जड मानले जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चेन्नईतील खेळपट्ट्यांवर कामगिरी उंचावण्यात अपयशी ठरल्यावर कोलकाताचा संघ आता वानखेडेवरील फलंदाजांना पोषक खेळपट्टीवर कसा खेळ करतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. कोलकाताचे प्रशिक्षक बँडन मॅकक्युलम यांनी रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरुविरुद्धच्या पराभवानंतर संघात अनेक बदल करण्यात येतील, असे मत व्यक्त केले होते. त्यामुळे कर्णधार ईऑन मॉर्गनला कोलकाताची नव्याने संघबांधणी करावी लागणार आहे.

* वेळ : सायंकाळी ७.३० वा.

चेन्नई सुपर किंग्ज

अष्टपैलूंवर मदार

मोईन अली, सॅम करन, ड्वेन ब्राव्हो आणि रवींद्र जडेजा या अष्टपैलूंनी तिन्ही आघाड्यांवर केलेल्या अप्रतिम कामगिरीच्या बळावर चेन्नईने राजस्थान रॉयल्सला धूळ चारली. त्यामुळे या चौकडीवर चेन्नईची प्रामुख्याने भिस्त असेल. सलामीवीर ऋतुराज गायकवाडचे अपयश चेन्नईला सलत आहे. त्याशिवाय सुरेश रैना आणि कर्णधार धोनीकडून चाहत्यांना मोठ्या खेळीची अपेक्षा आहे. दीपक चहर आणि शार्दूल ठाकूर यांच्यावर वेगवान माऱ्याची भिस्त असून लुंगी एन्गिडी या लढतीसाठी उपलब्ध असल्याने धोनी त्याला संधी देणार का, हे पाहणे रंजक ठरेल.

कोलकाता नाइट रायडर्स

परदेशी खेळाडूंकडून अपेक्षा

कर्णधार मॉर्गन, आंद्रे रसेल, पॅट कमिन्स आणि शाकिब अल हसन या कोलकाताच्या विदेशी खेळाडूंना अद्यापही लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे अष्टपैलू सुनील नारायणला शाकिबच्या ऐवजी संधी मिळू शकते. नितीश राणा सातत्यपूर्ण प्रदर्शन करत असला तरी त्याला शुभमन गिल आणि राहुल त्रिपाठी यांची अपेक्षित साथ लाभणे गरजेचे आहे. फिरकीपटू वरुण चक्रवर्ती कोलकातासाठी मोलाची भूमिका बजावत आहे. परंतु त्याच्या गोलंदाजीचा योग्य तो वापर करण्यात मॉर्गन अपयशी ठरत आहे. हरभजन सिंगलासुद्धा अद्याप छाप पाडता आलेली नाही.

मराठीतील सर्व आयपीएल २०२१ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2021 kolkata clash with mighty chennai abn
First published on: 21-04-2021 at 00:32 IST