भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने पुन्हा एकदा आपल्या नेतृत्वाची कमाल दाखवली असून आयपीएलमध्ये चेन्नईला चौथ्यांदा ट्रॉफी जिंकवून दिली आहे. कोलकातासोबत झालेल्या अंतिम सामन्यात चेन्नईने अत्यंत सहजपणे विजय खेचून आणला. फॅफ डय़ूप्लेसिसच्या (८६) उत्कृष्ट फलंदाजीनंतर मुंबईकर शार्दूल ठाकूरने (३/३८) केलेल्या भेदक माऱ्यामुळे चेन्नईने कोलकाता नाइट रायडर्सला २७ धावांनी धूळ चारत इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटच्या १४व्या हंगामाचे जेतेपद पटकावले. महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या चेन्नईचे हे चौथे ‘आयपीएल’ जेतेपद ठरले.

IPL 2021 : चेन्नईचा विजयी चौकार ! डय़ूप्लेसिस-शार्दूल यांच्यामुळे कोलकातावर २७ धावांनी मात

यामुळे पुन्हा एकदा धोनीच्या नेतृत्व कौशल्याची चर्चा सुरु झाली आहे. तसंच पुढच्या हंगामातही धोनीने खेळावं अशी अपेक्षाही व्यक्त होऊ लागली आहे. दरम्यान धोनीनेच हर्षा भोगले यांचा एका प्रश्नाला उत्तर देताना निवृत्तीच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. सामना संपल्यानंतर घेतलेल्या मुलाखतीत हर्षा भोगले यांनी धोनीला विचारलं की, “आपण मागे सोडून जात असलेल्या वारशाचा तुला अभिमान वाटत असेल”. यावर उत्तर देताना धोनीने, “आपण अजून सोडलेलं नाही…” असं मिश्कील उत्तर दिलं. धोनीने दिलेल्या या उत्तरानंतर उपस्थित प्रेक्षकांनीही आवाज करत त्याने पुढच्या आयपीएलमध्येही खेळावं अशी अपेक्षा व्यक्त केली.

दरम्यान यावेळी बोलताना धोनीने सांगितलं की, “आकडेवारी पाहिलं तर कामगिरीत सातत्य राखणाऱ्यांमध्ये आम्ही प्रथम आहोत, पण आम्ही अंतिम सामन्यातही पराभूत झालो आहोत. विरोधी संघाला संधी न देणं या गोष्टीत जाणुनबुजून सुधारणा करण्यात आली. आगामी वर्षांमध्ये चेन्नई त्यासाठी ओळखली जाईल अशी आशा आहे. आम्ही खरं तर जास्त बोलत आहे. खासकरुन प्रत्येकाशी स्वतंत्र चर्चा होते. जेव्हा तुम्ही टीम रुममध्ये बोलता तेव्हा दबाव निर्माण होते. तुम्ही एका चांगल्या संघाशिवाय चांगली कामगिरी करु शकत नाही. आमच्याकडे चांगले खेळाडूही आहेत”.

यापुढे काय असं विचारण्यात आलं असता धोनीने सांगितलं की, “मी याआधीही सांगितलं आहे की, हे बीसीसीआयवर अवलंबून आहे. दोन नवीन संघ येत असल्याने चेन्नईसाठी काय योग्य याचा विचार करावा लागेल. पहिल्या तीन-चारमध्ये असणं महत्त्वाचं नाही, तर फ्रँचायझीला त्रास होणार नाही याची खात्री करण्यासाठी मजबूत कोअर निर्माण करण्याची गरज आहे. पुढील १० वर्षात कोण योगदान देऊ शकतं अशा कोअर ग्रुपची गरज आहे”.

धोनीने यावेळी चेन्नईच्या चाहत्यांचे आभार मानले. “मला चाहत्यांचे आभार मानायचे आहेत. आम्ही सध्या दुबईत आहोत. मात्र जेव्हा दक्षिण आफ्रिकेत होतो तेव्हाही मोठ्या प्रमाणात समर्थक होते. जणू काही आम्ही चेपॉक, चेन्नईत खेळत आहोत असं वाटत होतं,” असं धोनीने म्हटलं.

धोनीने यावेळी कोलकाता संघाचंही कौतुक केलं. ““मी चेन्नईबद्दल बोलण्यापूर्वी, मी कोलकाताबद्दल आधी बोलेन. दबावात असताना पुनरागमन करणं कठीण असतं. मात्र त्यांनी चांगली कामगिरी केली. जर आयपीएल जिंकण्यासाठी कोणता संघ पात्र असेल तर तो कोलकाता आहे. ब्रेकमुळे त्यांना मदत झाली असावी”.

ऑरेंज कॅप

(सर्वाधिक धावा काढणारे फलंदाज)

फलंदाज धावा

१. ऋतुराज गायकवाड (चेन्नई) ६३५

२. फॅफ डय़ूप्लेसिस (चेन्नई) ६३३

३. के. एल. राहुल (पंजाब) ६२६

४. शिखर धवन (दिल्ली) ५८७

५. ग्लेन मॅक्सवेल (बेंगळूरु) ५१३

पर्पल कॅप

(सर्वाधिक बळी घेणारे गोलंदाज)

गोलंदाज बळी

१. हर्षल पटेल (बेंगळूरु) ३२

२. आवेश खान (दिल्ली) २४

३. जसप्रीत बुमरा (मुंबई) २१

४. शार्दूल ठाकूर (चेन्नई) २१

५. मोहम्मद शमी (पंजाब) १९

संक्षिप्त धावफलक

चेन्नई सुपर किंग्ज : २० षटकांत ३ बाद १९२ (फॅफ डय़ूप्लेसिस ८६, मोईन अली नाबाद ३७, ऋतुराज गायकवाड ३२; सुनील नरिन २/२६) विजयी वि. कोलकाता नाइट रायडर्स २० षटकांत ९ बाद १६५ (शुभमन गिल ५१, वेंकटेश अय्यर ५०; शार्दूल ठाकूर ३/३८, जोश हेझलवूड २/२९)