अबू धाबी : किरॉन पोलार्डची अष्टपैलू चमक (नाबाद १५ धावा आणि २ बळी) आणि हार्दिक पंडय़ा (नाबाद ४०), सौरभ तिवारी (४५) यांच्या महत्त्वपूर्ण योगदानामुळे मुंबई इंडियन्सने इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) मंगळवारी झालेल्या सामन्यात पंजाब किंग्जवर सहा गडी आणि सहा चेंडू राखून वर्चस्व गाजवले.

प्रथम फलंदाजी करताना पंजाबचे खेळाडू ठराविक अंतराने बाद झाले. ४ बाद ४८ धावांवरून एडिन मार्करम (४२) आणि दीपक हुडा (२८) यांनी ६१ धावांची भागीदारी रचल्यामुळे पंजाबने ६ बाद १३५ धावा उभारल्या. प्रत्युत्तरात बऱ्याच कालावधीनंतर सूर गवसलेल्या हार्दिकने १९व्या षटकातील अखेरच्या चेंडूवर विजयी षटकार लगावून मुंबईला पाचवा विजय मिळवून दिला. त्याने सौरभसह ३१, तर पोलार्डसह ४५ धावांची भागीदारी केली. या सामन्यात पोलार्डने ट्वेन्टी-२०मधील ३०० बळींचा टप्पाही गाठला.

संक्षिप्त धावफलक

पंजाब किंग्ज : २० षटकांत ६ बाद १३५ (एडिन मार्करम ४२, दीपक हुडा २८; किरॉन पोलार्ड २/८) पराभूत वि. मुंबई इंडियन्स : १९ षटकांत ४ बाद १३७ (सौरभ तिवारी ४५, हार्दिक पंडय़ा नाबाद ४०; रवी बिश्नोई २/२५)

दिल्लीचा विजयरथ कोलकाताने रोखला

शारजा : अनुभवी सुनील नरिनच्या (१० चेंडूंत २१ धावा आणि २ बळी) अष्टपैलू कामगिरीमुळे मंगळवारी दिल्ली कॅपिटल्सने शरणागती पत्करली. नरिनने दिलेल्या दुहेरी योगदानाला नितीश राणाच्या (नाबाद ३६) संयमी फलंदाजीची साथ लाभल्यामुळे कोलकाता नाइट रायडर्सने ‘आयपीएल’मध्ये दिल्लीचा चार सामन्यांचा विजयरथ रोखताना त्यांच्यावर तीन गडी राखून मात केली. दिल्लीने दिलेले १२८ धावांचे लक्ष्य कोलकाताने १८.२ षटकांत गाठले. ११ सामन्यांतील पाच विजयांच्या १० गुणांसह कोलकाताने बाद फेरीची शर्यत रंगतदार केली. दिल्लीकडून आवेश खानने तीन बळी मिळवले.

विजयी सातत्य राखण्याचे बेंगळूरुचे ध्येय

दुबई  : विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरुला सलग दुसऱ्या हंगामात बाद फेरी गाठण्याची नामी संधी आहे. त्यामुळे गतविजेत्या मुंबई इंडियन्सला धूळ चारल्यावर आता बुधवारी राजस्थान रॉयल्सविरुद्ध होणाऱ्या ‘आयपीएल’ लढतीत विजयी सातत्य टिकवण्याचे बेंगळूरुचे लक्ष्य असेल. बेंगळूरुच्या खात्यात १० सामन्यांत १२ गुण आहेत. कोहलीन गेल्या दोन सामन्यांत अर्धशतके झळकावून अन्य संघांना इशारा दिला आहे. ‘पर्पल कॅप’च्या शर्यतीत अग्रस्थानी असलेला हर्षल पटेल त्यांच्यासाठी मोलाची भूमिका बजावत आहे. दुसरीकडे राजस्थानला मागील दोन सामन्यांत अनुक्रमे दिल्ली आणि हैदराबादने पराभूत केले. त्यामुळे १० सामन्यांतून आठ गुण नावावर असलेल्या राजस्थानने येथून पुढे प्रत्येक लढत जिंकणे अनिवार्य आहे.

’ वेळ : सायंकाळी ७.३० वा. ’ थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स १ हिंदी