महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जने आयपीएल २०२१च्या अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला. दुबईच्या मैदानावर रंगलेल्या सामन्यतच चेन्नईने दिल्लीला मात दिली. रंगतदार झालेल्या सामन्यात धोनीने मोक्याच्या क्षणी झुंजार खेळी करत आपणच सर्वोत्तम फिनिशर असल्याचे दाखवून दिले. त्याची खेळी पाहून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कप्तान विराट कोहलीनेही त्याच्यासाठी एक ट्वीट केले. त्याचे हे ट्वीट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विराट आपल्या ट्वीटमध्ये म्हणाला, ”आणि राजा परत आला आहे. गेममधील आतापर्यंतचा सर्वात मोठा फिनिशर. आज पुन्हा एकदा मला माझ्या जागेवर उडी मारता आली.” विराटने आपल्या ट्वीटमधून धोनीला सर्वोत्तम फिनिशर म्हणत रोमाचंक सामन्याचा अनुभव घेता आल्याचे सांगितले. आज म्हणजेच ११ ऑक्टोबरला बंगळुरूचा सामना कोलकाताशी होणार आहे. त्यामुळे विराटला कोलकाता आणि दिल्लीला मात देऊन धोनीसमोर उभे राहायला नक्की आवडेल.

हेही वाचा – तो आला अन् त्यानं जिंकलं..! तब्बल ३००च्या स्ट्राइक रेटनं धोनीनं फिरवला सामना!

असा रंगला सामना

ऋतुराज गायकवाड, राॉबिन उथप्पा आणि कप्तान महेंद्रसिंह धोनी यांनी दिलेल्या योगदानाच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्जने दिल्ली कॅपिटल्सचा ४ गडी राखून पाडाव करत आयपीएल २०२१च्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. दुबईच्या मैदानावर प्रेक्षकांना रंगतदार सामना पाहायला मिळाला. नाणेफेक जिंकलेल्या धोनीने दिल्लीला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. सलामीवीर पृथ्वी शॉ आणि कप्तान ऋषभ पंत यांनी केलेल्या अर्धशतकी खेळींमुळे दिल्लीने २० षटकात ५ बाद १७२ धावा केल्या. प्रत्युत्तरात ऋतुराज -रॉबिनने ११० धावांची भागीदारी करत चेन्नईला चांगल्या स्तरावर पोहोचवले, परंतु दिल्लीच्या गोलंदाजांनी उत्तम मारा करत चेन्नईला संकटात टाकले होते. शेवटच्या क्षणी केलेल्या फटकेबाजीमुळे धोनीने चेन्नईला २ चेंडू राखून विजय मिळवून दिला. ऋतुराजला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. या पराभवामुळे आपले आव्हान टिकवून ठेवण्यासाठी दिल्लीला अजून एक संधी मिळणार आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2021 virat kohlis tweet about ms dhoni after csk enters final adn
First published on: 11-10-2021 at 00:25 IST