आयपीएल २०२२चे वेळापत्रक जवळपास निश्चित झाले आहे. आयपीएलचा पंधरावा हंगाम २६ मार्चपासून सुरू होऊ शकतो आणि अंतिम सामना २९ मे रोजी खेळवला जाऊ शकतो. टी-२० लीगच्या चालू हंगामात ८ ऐवजी १० संघ उतरत आहेत. नुकत्याच झालेल्या लिलावात एकूण २०४ खेळाडूंना खरेदी करण्यात आले. यापूर्वी ३३ खेळाडू कायम ठेवण्यात आले होते. म्हणजेच एकूण २३७ खेळाडू या स्पर्धेत खेळणार आहेत. या स्पर्धेतील साखळी फेरीचे सामने महाराष्ट्रात होणार आहेत. मुंबईत ५५ सामने खेळवले जाऊ शकतात. आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलची बैठक उद्या २४ फेब्रुवारीला होणार आहे.

क्रिकबझच्या बातमीनुसार, आयपीएलच्या साखळी फेरीचे सामने महाराष्ट्रात होणार आहेत. साखळी फेरीत एकूण ७० सामने खेळवले जाणार आहेत. मुंबईतील वानखेडे स्टेडियम, डीवाय पाटील आणि ब्रेबॉर्न या तीन ठिकाणी एकूण ५५ सामने खेळवले जाणार आहेत. याशिवाय पुण्यात १५ सामने होणार आहेत. सर्व १० संघ वानखेडे आणि डीवाय पाटील येथे प्रत्येकी ४ सामने खेळतील. याशिवाय त्याला पुणे आणि ब्रेबॉर्नमध्ये प्रत्येकी ३-३ सामने खेळावे लागणार आहेत. चालू हंगामापासून टी-२० लीगमधील सामन्यांची संख्या ६० वरून ७४ वर पोहोचली आहे.

हेही वाचा – ना शतक, ना फॉर्म..! तरीही विराट कोहलीला मिळालाय ‘असा’ सन्मान; ट्विटरवर उडवलाय धुरळा!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अहवालानुसार, आतापर्यंत आयपीएल प्लेऑफच्या ४ सामन्यांचे ठिकाण निश्चित झालेले नाही. पण मिळालेल्या माहितीनुसार अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर बाद फेरीचे सामने खेळवले जाऊ शकतात. गुरुवार, २४ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलच्या बैठकीत संपूर्ण वेळापत्रकावर चर्चा केली जाईल.