दोन पराभवांनंतर सनरायजर्स हैदराबादला आयपीएलच्या सातव्या मोसमात आपले खाते उघडता आले. आता आत्मविश्वास उंचावलेल्या हैदराबादची रविवारी खरी अग्निपरीक्षा चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध आहे.
सनरायजर्स हैदराबादची आयपीएल हंगामाची सुरुवात निराशाजनक झाली. पहिल्या दोन सामन्यांत अनुक्रमे राजस्थान रॉयल्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाबकडून त्यांनी हार पत्करली. परंतु दुबईत शनिवारी रात्री हैदराबादच्या संघाने आपली कामगिरी उंचावली आणि दिल्ली डेअरडेव्हिल्सविरुद्ध चार धावांनी निसटता विजय मिळवला.
आरोन फिंच (८८) आणि डेव्हिड वॉर्नर यांच्या लाजवाब खेळींमुळे हैदराबादला हा विजय साकारता आला. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी १२८ धावांची भागीदारी केली. त्यानंतर हैदराबादी गोलंदाजांनी दिल्लीला ४ बाद १८० धावांवर रोखून आपला विजय नोंदवला.
चेन्नई सुपर किंग्जकडे आयपीएलमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करणारा संघ म्हणून पाहिले जात आहे. फिंच आणि वॉर्नर अशा संघाविरुद्ध आपल्या कामगिरीची पुनरावृत्ती करण्यासाठी उत्सुक आहे. कर्णधार आणि सलामीवीर शिखर धवन आपल्या दर्जाला साजेशी फलंदाजी अद्याप साकारू शकलेला नाही. मधल्या फळीतील फलंदाज लोकेश राहुल आणि वाय. वेणुगोपाल राव यांनाही सूर गवसलेले नाही.
संघ
चेन्नई सुपर किंग्ज : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), सुरेश रैना, आर. अश्विन, रवींद्र जडेजा, ड्वेन ब्राव्हो, फॅफ डय़ू प्लेसिस, ब्रेन्डन मॅक्क्युलम, ड्वेन स्मिथ, आशिष नेहरा, मोहित शर्मा, सॅम्युअल बद्री, बेन हिल्फेनहॉस, मॅट हेन्री, बाबा अपराजित, मिथुन मिन्हास, ईश्वर पांडे, पवन नेगी, विजय शंकर, रोनित मोरे, जॉन हॅस्टिंग्स.
सनरायजर्स हैदराबाद : शिखर धवन (कर्णधार), डेल स्टेन, डेव्हिड वॉर्नर, डॅरेन सॅमी, अमित मिश्रा, आरोन फिंच, इरफान पठाण, इशांत शर्मा, भुवनेश्वर कुमार, ब्रेन्डन टेलर, मोझेस हेन्रिक्स, वेणुगोपाल राव, जेसन होल्डर, एस. अनिरुद्ध, मनप्रीत जुनैजा, के. एल. राहुल, अमित पाऊनिकर, नमन ओझा, रिकी भुई, आशीष रेड्डी, चामा मिलिंद, परवेझ रसूल, प्रशांत परमेश्वरन आणि करण शर्मा.