आयपीएलच्या लिलावात बांगलादेशचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसनच्या हाती निराशा आली. बंगळुरुमध्ये पार पडलेल्या दोन दिवसीय आयपीएल लिलावात कोणत्याही संघाने शाकिब अल हसनला विकत घेण्यात रस दाखवला नाही. २ कोटींची मूळ किंमत ठेवलेल्या बांगलादेशाच्या या अष्टपैलू खेळाडूला पुन्हा संघात घेण्यात कोलकाता नाईट रायडर्सही उत्सुक दिसला नाही.

३४ वर्षीय शाकिब अल हसनला कोणत्याही संघाने विकत का घेतलं नाही यासंबंधी चर्चा सुरु असताना त्याच्या पत्नीने फेसबुक पोस्ट शेअर करत यामागील कारण सांगितलं आहे. शाकिब जगातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू असून एकटा संपूर्ण सामन्याचं चित्र बदलू शकतो.

शाकिबच्या पत्नीने काय म्हटलं आहे?

शाकिबची पत्नी उम्मी अल हसनने फेसबुक पोस्टमध्ये लिहिलं आहे की, “तुम्ही उत्साहित व्हाल त्याआधी तुम्हाला सांगू इच्छिते की, लिलावाच्या आधी अनेक संघांनी थेट संपर्क साधत तुम्ही संपूर्ण सीझनसाठी उपलब्ध आहात का विचारणा केली होती. पण दुर्दैवाने तसं होऊ शकलं नाही, कारण श्रीलंकेविरोधात मालिका होणार आहे. त्यामुळेच त्याला कोणत्याही संघाने खरेदी केलं नाही”.

पुढे त्यांनी लिहिलं आहे की, “लिलावात खरेदी न केलं जाणं काही मोठी गोष्ट नाही. हा काही शेवट नाही, नेहमी पुढचं वर्ष असतं. विकत घेतल्यास त्याला श्रीलंका मालिक सोडावी लागली असती, त्यामुळे जर त्याची निवड झाली असती तरी तुम्ही असंच म्हणाला असता का? की आतापर्यंत देशद्रोही ठरवलं असतं?”.

शाकिब सध्या जबदरस्त फॉर्ममध्ये आहेत. आयपीएलमध्ये शाकिबने आतापर्यंत ७१ सामन्यांमधील ५२ डावांमध्ये १२४.४९ च्या सरासरीने एकूण ७९३ धावा केल्या आहेत, ज्यामध्ये दोन अर्धशतकांचा समावेश आहे. गोलंदाजीतही त्याने कमाल केली असून ६३ विकेट्स घेतल्या आहेत. यामधील एका सामन्यात त्याने १७ धावा देत तीन गडी बाद केले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शाकिबने आतापर्यंत ३६० टी-२० सामन्यांमध्ये ५८५० धावा केल्या आहेत. यामध्ये २२ अर्धशतकांचा समावेश आहे. नावाद ८६ धावा त्याची सर्वात्कृष्ट खेळी आहे. दरम्यान त्याने ४१३ विकेट्स घेतल्या असून ६ धावा देत ६ गडी बाद हे सर्वात्कृष्ट प्रदर्शन आहे. शाकिबने १० वेळा ४ विकेट आणि चार वेळा ५ विकेट्स घेतल्या आहेत.