विश्वचषक स्पर्धा संपल्यानंतर पुन्हा एकदा IPL च्या पुढील हंगामासाठी संघ व्यवस्थापनाने संघांची बांधणी सुरू केली आहे. विविध खेळाडूंच्या हस्तांतरण प्रक्रियेलादेखील वेग आला आहे. अभिनेता शाहरूख खानच्या कोलकाता नाईट रायडर्स संघानेही कंबर कसली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून नुकताच निवृत्त झालेला न्यूझीलंडचा माजी कर्णधार ब्रेंडन मॅक्कलम याची कोलकाताच्या प्रशिक्षकपदी निवड झाली आहे.

IPL मध्ये ब्रेंडन मॅक्कलम आणि कोलकाता संघाचे घनिष्ठ नाते आहे. मॅक्कलम सुरूवातीला २००८ ते २०१० आणि नंतर २०१२-१३ या कालावधीत कोलकाता संघातून खेळला होता. तसेच २०१२ च्या विजेत्या संघाचाही तो भाग होता. याशिवाय कॅरिबियन प्रिमिअर लीग (CPL) स्पर्धेत २०१६ ते २०१८ या कालावधीत त्याने त्रिनबॅगो नाईट रायडर्स संघाचे प्रतिनिधित्व केले होते. त्यात २०१७ आणि २०१८ या दोनही हंगामात त्याच्या संघाने विजेतेपद मिळवले.

“प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारणे ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. कोलकाता नाईट रायडर फ्रँचायसीने IPL आणि CPL अशा दोनही स्पर्धांमध्ये दमदार कामगिरी केली आहे. त्यांनी फ्रँचायसी क्रिकेटमध्ये मोठे यश संपादन केले आहे. दोनही संघांकडे गुणवान खेळाडूंचा संघ आहे. त्याच्यांतील प्रतिभेला योग्य मार्गदर्शन करणे आणि त्यांना चांगली कामगिरी करण्यासाठी प्रोत्साहन ही आमची जबाबदारी आहे”, असे मॅक्कलम म्हणाला.