बिग बॉसमधून प्रसिद्धीस आलेली गायिका सपना चौधरी उत्तर भारतातील लोकप्रिय नाव आहे. सपना चौधरीचं ‘तेरी आंख्या का यो काजल’ हे गाणं उत्तर भारतात प्रचंड प्रसिद्द आहे. सपना चौधरीच्या प्रसिद्धीनंतर गाणं प्रचंड प्रसिद्ध झालं आहे. अनेक कार्यक्रमांमध्ये या गाण्यावर तरुणाई थिरकताना दिसत असते. आता तर वेस्टइंडिजचा तुफानी फलंदाज ख्रिस गेल याच्यावरही गाण्याची जादू चढली असून त्याने ठुमके लगावले आहेत. सपना चौधरीने स्वत: आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ख्रिस गेलचा डान्स करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओत ख्रिस गेल आपल्या नेहमीच्या अंदाजात बिनधास्तपणे गाण्यावर थिरकताना दिसत आहे.
सपना चौधरीने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करताना लिहिलं आहे की, पहा मला इंटरनेटवर काय मिळालं. ख्रिस गेल तू खूप चांगला डान्सर आहेस. ख्रिस गेलचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे आणि लोकांना तो प्रचंड आवडतही आहे. याआधीही ख्रिस गेलचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत, ज्यामध्ये तो अत्यंत निर्धास्तपणे एन्जॉय करत डान्स करतो आहे.
सपना चौधरीने जरी ख्रिस गेल आपल्या नावावर नाचत असल्याचा दावा केला असला तरी हा व्हिडीओ वर्षभरापूर्वीचा असून कोणीतरी एडिट करुन टाकला आहे. जुन्या व्हिडीओत ख्रिस गेल लैला मै लैला गाण्यावर हा डान्स करताना दिसत आहे. त्यावेळीही हा व्हिडीओ व्हायरल झाला होता.

