हैदराबादविरूद्धच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने २० षटकांत १६० पार मजल मारली. कोलकाताचे आजी-माजी कर्णधार दिनेश कार्तिक आणि इयॉन मॉर्गन या जोडीने शेवटच्या काही षटकांत दमदार फटकेबाजी करत संघाला १६३ धावांचा पल्ला गाठून दिला. या दोघांची अर्धशतकी भागीदारी कोलकातासाठी महत्त्वाची ठरली.
१६४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादने फलंदाजीच्या क्रमात बदल केले. केन विल्यमसनला जॉनी बेअरस्टोसोबत सलामीला पाठवण्यात आले. या दोघांनी अर्धशतकी सलामी दिली. सामन्यात विल्यमसनने शिवम मावीच्या गोलंदाजीवर एक विचित्र षटकार लगावला. सहाव्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर विल्यमसनने मागच्या दिशेला षटकार खेचला. चेंडू थेट मैदानाबाहेर गेला. त्याचा हा फटका पाहून कार्तिक आणि मॉर्गनदेखील अवाक झाल्याचं दिसून आलं.
त्याआधी, नाणेफेक जिंकून हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. कोलकाताच्या संघाकडून राहुल त्रिपाठी आणि शुबमन गिल या दोघांनी तडाखेबाज सुरूवात केली. पॉवरप्लेच्या षटकांमध्ये त्यांनी ४८ धावा झोडल्या. पण पॉवरप्लेच्या शेवटच्या चेंडूवर त्रिपाठी त्रिफळाचीत झाला. त्याने २३ धावा केल्या. शुबमन गिल आणि नितीश राणाने फटकेबाजी केली. पण गिल ५ चौकारांसह ३६ धावांवर तर नितीश राणा ३ चौकार व एका षटकारासह २९ धावांवर बाद झाला. धोकादायक आंद्रे रसल आजही स्वस्तात (९) बाद झाला. त्यानंतर संघाचे आजी-माजी कर्णधार दिनेश कार्तिक आणि इयॉन मॉर्गन यांनी शेवटपर्यंत तळ ठोकला. ३० चेंडूत या दोघांनी ५८ धावांची भागीदारी केली. कार्तिकने २ चौकार आणि २ षटकारांसह नाबाद २९ धावा केल्या. तर इयॉन मॉर्गनने 3 चौकार आणि एका षटकारासह ३४ धावा केल्या.