प्रेक्षकांना चौकार व षटकारांच्या आतषबाजीचा आनंद देत मयांक अगरवाल व युवराजसिंग यांनी शानदार अर्धशतके झळकावली आणि त्यामुळेच दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाला स्पर्धेत विजयाची बोहनी करता आली. त्यांनी किंग्ज इलेव्हन पंजाबला पाच विकेट्स आणि एक चेंडू बाकी राखून पराभूत केले. इम्रान ताहीरने तीन विकेट्स मिळवल्यामुळे दिल्लीने पंजाबला १६५ धावांमध्ये रोखता आले आणि हे आव्हान त्यांनी सहजपणे पूर्ण केले.
प्रथम फलंदाजी करताना पंजाबने २० षटकांत ७ बाद १६५ धावांची मजल गाठली. त्याचे श्रेय वीरेंद्र सेहवाग व वृद्धीमान साहा यांच्या आक्रमक खेळाला द्यावे लागेल. सेहवागने ४१ चेंडूंत ४७ धावा करताना दोन षटकार व चार चौकार लगावले. साहाने २८ चेंडूंत ३९ धावा करताना तीन षटकार फटकावले. या दोघांनी ७१ धावांची भागीदारी केली. मात्र प्रेक्षकांना अपेक्षित असलेले ग्लेन मॅक्सवेल व डेव्हिड मिलर हे झटपट बाद झाल्यामुळे प्रेक्षकांची निराशाच झाली. मॅक्सवेलने इम्रान ताहीरच्या एकाच षटकांत दोन उत्तुंग षटकार ठोकले मात्र त्याच षटकांत तो १५ धावांवर बाद झाला. मिलरने केवळ पाच धावा केल्या. कर्णधार जॉर्ज बेली (१९) व अक्षर पटेल (१३) यांच्या आक्रमक खेळामुळे पंजाबने १९ व्या षटकांत १९ धावा जमविल्या. पण २० व्या षटकांत ताहीरने किंग्ज संघाच्या फलंदाजीवर नियंत्रण ठेवताना शेवटच्या दोन चेंडूंवर याच दोघांना बाद केले. दिल्लीकडून ताहीर याने सर्वाधिक तीन बळी घेतले मात्र त्यासाठी त्याला ४३ धावा गमवाव्या लागल्या. कर्णधार जीन पॉल डय़ुमिनी याने दोन बळी मिळविले. दिल्लीच्या फिरकी गोलंदाजांनी धावा रोखण्याची चांगली कामगिरी केली.
दिल्लीची सुरुवात निराशाजनक झाली. संघाचे अर्धशतक पार करताना त्यांनी दोन विकेट्स गमावल्या. श्रेयस अय्यर (६) याच्यापाठोपाठ डय़ुमिनी २१ धावांवर तंबूत परतला. तो बाद झाल्यानंतर दिल्लीच्या मयांक अगरवाल व युवराज सिंग यांनी धावफलक हालता ठेवला. सुरुवातीला युवराजने चौकारांवरच अधिक भर दिला. त्याने सलामीवीर अगरवालच्या साथीत संघाचे धावांचे शतक १३.४ षटकांत पूर्ण केले. अगरवालने मिचेल जॉन्सनला उत्तुंग षटकार मारुनच ३३ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. पाठोपाठ युवराजने पटेलच्या षटकांत दोन षटकार व अनुरीत सिंगला एक षटकार ठोकून अर्धशतक पूर्ण केले. या जोडीने शंभरची भागीदारी केवळ ६१ चेंडूंत पार केली. मात्र १९ व्या षटकांत अनुरीतसिंगने प्रथम युवराज व त्यापाठोपाठ पुढच्याच चेंडूंवर अगरवाल याला बाद करीत दिल्लीला धक्का दिला. त्या वेळी त्यांना विजयासाठी नऊ चेंडूंमध्ये सात धावांची गरज होती. युवराजने ३९ चेंडूंत ५५ धावा करताना पाच चौकार व तीन षटकार अशी आतषबाजी केली. अगरवालने ४८ चेंडूंत ६८ धावा केल्या, त्यामध्ये सात चौकार व दोन षटकारांचा समावेश होता. या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी ६६ चेंडूंत १०६ धावांची भर घातली.
विजयासाठी केवळ एक धाव बाकी असताना दिल्लीने शेवटच्या षटकांत केदार जाधव (३) याची विकेट गमावली. अखेर अक्षर पटेलच्या या षटकातील पाचव्या चेंडूंवर अँजेलो मॅथ्युजने चौकार मारुन विजय मिळविला.
संक्षिप्त धावफलक
किंग्ज इलेव्हन पंजाब: २० षटकांत ७ बाद १६५ (वीरेंद्र सेहवाग ४७, वृद्धीमन साह ३९ ; इम्रान ताहीर ३/४३, जे. पी. डय़ुमिनी २/१६) पराभूत विरुद्ध दिल्ली डेअरडेव्हिल्स : १९.५ षटकांत ५ बाद १६९ (मयांक अगरवाल ६८ युवराजसिंग ५५ ; अनुरीत सिंग २/३३).
सामनावीर : मयांक अगरवाल.