Heinrich Klaasen Century: हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये ईशान किशन आणि हेनरिक क्सासेनने वादळी खेळी केली. या हंगामातील पहिल्या हंगामापासून सनरायझर्स हैदराबादकडून ३०० धावांच्या अपेक्षा होत्या. या आव्हानाच्या जवळपास पोहोचण्यात त्यांना यश आलं, पण ३०० धावा त्यांना करता आलेल्या नाहीत. कोलकाता नाईट रायडर्स संघाविरूद्ध झालेल्या सामन्यातही हैदराबादकडे ३०० धावा करण्याची संधी होती. मात्र, हैदराबादला २७८ धावांपर्यंत मजल मारता आली. यादरम्यान हेनरिक क्लासेनने अवघ्या ३७ चेंडूत शानदार शतकी खेळी केली. यासह तो आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील तिसरा सर्वात वेगवान शतकवीर ठरला आहे.
हेनरिक क्लासेन आपल्या विस्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जातो. मात्र, त्याला हैदराबादकडून फलंदाजी करताना वरच्या क्रमांकावर फलंदाजीला येण्याची संधी मिळत नव्हती. एकापेक्षा एक विस्फोटक फलंदाज संघात असताना, क्लासेनची फलंदाजी आली तरीदेखील त्याला हवे तितके चेंडू खेळण्याची संधी मिळत नव्हती. या हंगामातील शेवटच्या सामन्यात हैदराबादने आपल्या फलंदाजीक्रमात बदल केला. क्लासेनला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवलं. या संधीचा त्याने पुरेपूर फायदा घेतला. सुरूवातीपासूनच त्याने कोलकाता नाईट रायडर्सच्या गोलंदाजांवर हल्लाबोल केला.
आधी हेडसोबत मिळून त्याने केकेआरच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. त्यानंतर त्याने ईशानसोबत मिळून धावांचा डोंगर उभारला. यादरम्यान त्याने अवघ्या १७ चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. त्यानंतर ३७ चेंडूत त्याने आपलं शतक पूर्ण केलं. हे आयपीएल २०२५ स्पर्धेतील दुसरं सर्वात वेगवान शतक ठरलं आहे. यासह आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील तिसरं सर्वात वेगवान शतक ठरलं आहे.
आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात सर्वात वेगवान शतक झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत ख्रिस गेल अव्वल स्थानी आहे. ख्रिस गेलने अवघ्या ३० चेंडूत आपलं शतक पूर्ण केलं होतं. त्याने २०१३ मध्ये पुणे वॉरियर्स इंडियाविरूद्ध खेळताना हे शतक पूर्ण केलं होतं. त्यानंतर याच हंगामात १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीने गुजरात टायटन्सविरूद्ध फलंदाजी करताना अवघ्या ३५ चेंडूत आपलं शतक पूर्ण केलं होतं. राजस्थान रॉयल्सचा माजी फलंदाज युसूफ पठाण या यादीत तिसऱ्या स्थानी आहे. युसूफ पठाणने देखील ३७ चेंडूत आपलं शतक पूर्ण केलं होतं. हे या स्पर्धेच्या इतिहासातील तिसरं सर्वात वेगवान शतक आहे. आता क्लासेनने ३७ चेंडूत आपलं शतक पूर्ण करत युसूफ पठाणच्या रेकॉर्डची बरोबरी केली आहे.