नवी मुंबई : दिल्ली कॅपिटल्सने आपला सलामीचा पेच सोडवून डेव्हिड वॉर्नरकरिता योग्य साथीदार दिल्यास ‘आयपीएल’ची बाद फेरी त्यांना गाठता येईल. रविवारी दिल्लीचा सामना स्पर्धेतील आव्हान टिकवण्यासाठी धडपडणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जशी असेल. दिल्लीने १० सामन्यांत पाच विजयांसह १० गुण मिळवत गुणतालिकेत पाचवे स्थान राखले आहे. दुसरीकडे, गतविजेत्या चेन्नईच्या खात्यावर १० सामन्यांत तीन विजयांसह फक्त ६ गुण जमा आहेत. पृथ्वी शॉने २५९ धावा केल्या असल्या तरी वॉर्नरला (८ सामन्यांत ३५६ धावा) तोलामोलाची साथ तो देऊ शकलेला नाही. फिरकीपटू कुलदीप यादव (१८ बळी) आणि वेगवान गोलंदाज खलील अहमद (१४ बळी) यांच्यावर दिल्लीच्या गोलंदाजीची धुरा आहे.

चेन्नईकडून अंबाती रायुडू, महेंद्रसिंह धोनी, शिवम दुबे आणि मोईन अली यांनी काही चांगल्या खेळी केल्या आहेत. पण त्यांच्या फलंदाजीत सातत्याचा अभाव जाणवला. गोलंदाजीत माहीश ठीकसाना, मुकेश चौधरी आणि ड्वेन ब्राव्हो यांनी बळी मिळवले आहेत.

  • वेळ : सायं. ७.३० वा.
  • थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, २, १ हिंदी, सिलेक्ट १