इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरुची गुरुवारी इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) किंग्ज इलेव्हन पंजाबशी लढत होत आहे. सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी याद्वारे कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील बेंगळूरुला आहे.

बेंगळूरुने ‘आयपीएल’च्या हंगामाची सुरुवात सनरायजर्स हैदराबादवर विजय मिळवत दणक्यात केली. कोहली अपयशी ठरला तर अन्य खेळाडू संघाला विजय मिळवून देण्याची क्षमता राखून आहेत. पहिल्या सामन्यात हैदराबादविरुद्ध सलामीवीर आणि कर्नाटकचा गुणवान डावखुरा फलंदाज देवदत्त पडिक्कलने दमदार खेळी केली. त्याने ‘आयपीएल’मध्ये पदार्पणातच ५६ धावांची फटकेबाजी केली. एबी डीव्हिलियर्सनेही ५१ धावांची फटकेबाजी करत तो लयीत असल्याचे दाखवले आहे. या स्थितीत जर कोहलीची बॅट तळपली तर बेंगळूरुला मोठी धावसंख्या सहज करता येईल.

आरोन फिंचचा सहभाग बेंगळूरुची फलंदाजीची ताकद आणखी वाढवते. गोलंदाजीत फिरकीपटू यजुवेंद्र चहलवर बेंगळूरुची सर्वाधिक भिस्त आहे.

किंग्ज इलेव्हन पंजाबला मात्र ‘आयपीएल’मध्ये पहिल्या लढतीत दिल्ली कॅपिटल्सकडून हार स्वीकारावी लागली. त्या लढतीत १५८ धावांचे लक्ष्य गाठताना पंजाबने चांगलीच झुंज दिली होती. मात्र अखेरच्या चेंडूवर विजयासाठी एक धाव कमी पडली त्यामुळे ती लढत ‘सुपर ओव्हर’वर गेली. ‘सुपर ओव्हर’मध्ये दिल्लीने बाजी मारली.

सलामीवीर मयांक अगरवालचे त्या लढतीत थोडक्यात शतक हुकले. सलामीवीर के. एल. राहुलची जर बॅट तळपली तर अगरवालसह चांगली सलामी देण्याची संधी पंजाबला आहे. मधल्या फळीतील ग्लेन मॅक्सवेलसह फलंदाजांचे अपयश ही पंजाबसाठी चिंतेची बाब आहे. गोलंदाजीत मोहम्मद शमी आणि शेल्ड्रन कॉट्रेल ही वेगवान गोलंदाजांची जोडी ही पंजाबची ताकद आहे.

मिचेल मार्शची माघार

सनरायजर्स हैदराबादचा अष्टपैलू खेळाडू मिचेल मार्श याने घोटय़ाच्या दुखापतीमुळे इंडियन प्रीमियर लीगमधून (आयपीएल) माघार घेतली आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरुविरुद्धच्या सामन्यात पाचव्या षटकांत गोलंदाजी करताना त्याच्या घोटय़ाला दुखापत झाली आहे. त्याच्या जागी वेस्ट इंडिजचा कर्णधार जेसन होल्डर याची निवड करण्यात आली आहे.

* सामन्याची वेळ : सायं. ७:३० वा.

* थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी, सिलेक्ट १

मराठीतील सर्व आयपीएल २०२० बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2020 bangalore challenge to punjab abn
First published on: 24-09-2020 at 00:22 IST