प्रत्येक आयपीएल हंगामांमध्ये अनेक विक्रम मोडले जातात तर काही विक्रम नव्याने होतात. १९ सप्टेंबरपासून आयपीएलच्या तेराव्या हंगामाला सुरुवात होते आहे. सर्व संघ या हंगामासाठी कसून सराव करत आहेत. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्स संघानेही सरावाला सुरुवात केली आहे. श्रेयसच्या नेतृत्वाखाली दिल्लीने गेल्या हंगामात चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे यंदा या संघाकडून अनेकांना चांगल्या अपेक्षा आहेत. २० सप्टेंबरला दिल्लीचा संघ पंजाबविरुद्ध या हंगामातला पहिला सामना खेळेल. हंगामाला सुरुवात होण्याआधीच कर्णधार श्रेयस अय्यरने यंदाच्या हंगामात एकही सामना न गमावण्याचं स्वप्न बाळगलं आहे.

ESPNCricinfo शी बोलत असताना श्रेयसने आपला इरादा बोलून दाखवला. आयपीएलच्या आतापर्यंतच्या १२ हंगामांमध्ये एकही सामना न गमावता विजेतेपद मिळवण्याची किमया कोणत्याही संघाला साधता आलेली नाही. २००८ साली राजस्थान रॉयल्स संघाने फक्त ३ पराभव पदरी पाडत विजेतेपद पटकावलं होतं. त्यामुळे आतापर्यंत कोणालाही न जमलेली कामगिरी करुन दाखवण्याचा निर्धार श्रेयसने केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

करोना विषाणूमुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता यंदा प्रत्येक संघातील खेळाडूंवर निर्बंध घालण्यात आले आहेत. Bio Secure Bubble सोडण्यास खेळाडूंना मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे सर्व संघातील खेळाडूंना यंदा नियमांच्या चौकटीत राहून सराव करावा लागत आहे. त्यामुळे श्रेयस अय्यर यंदा ही विक्रमी कामगिरी करु शकतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.